बीड - जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे बाधित रुग्ण आढळून आला होता. त्या रुग्णाचा उपचारानंतरचा पहिला कोरोना अहवाल बुधवारी निगेटिव्ह आला आहे. ही बाब बीड जिल्ह्यासाठी समाधानकारक आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसरा स्वॅब घेण्यात येणार असून तोही निगेटिव्ह आला तर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल. त्यासोबतच बीड जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश व्हायला मदत होईल. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्यानंतर खळबळ उडाली होती. प्रशासनाने आष्टी तालुक्यातील त्या गावासह लगतचा परिसरदेखील सील केला होता. त्या रुग्णावर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार झाले. 14 दिवसांच्या उपचारानंतर त्याचा कोरोनासाठी स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता गुरुवारी त्याचा आणखी एक स्वॅब घेतला जाईल आणि त्याच्या अहवालानंतर तो रुग्ण कोरोनामुक्त झाला की नाही ते निश्चित होणार आहे.