परळी-वैजनाथ (बीड) - तालुक्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम दिसून येत आहे. मागच्या वर्षी सुरू झालेला कोरोना संसर्गाने आता उच्चांक गाठला आहे. यामुळे शहरातील नागरीकांनी गांभीर्याने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे मत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - पुण्यात मिनी लॉकडाऊनचा पहिला दिवस; पाहा काय आहे परिस्थिती
दुसऱ्या लाटेने कहर
तालुक्यात मागीलवर्षी मार्च व एप्रिलमध्ये एकही कोविड संसर्ग झालेला रुग्ण आढळला नव्हता. २६ मेला तालुक्यातील हाळम येथे पहिला रुग्ण आढळून आला. यानंतर जूनमध्ये शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आणि संसर्गाला सुरुवात झाली. पुढे जवळपास चार ते पाच महिने हा संसर्ग कमी अधिक प्रमाणात वाढत गेला. नंतर तालुक्यासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत गेला. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मात्र कहर केला असून तालुक्यात मार्च महिन्यात ४३७ अँक्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मार्च महिन्यात जवळपास ६ हजार १०८ अँटीजेन तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. यात ३३४ पॉझिटिव्ह रुग्ण तर ७८० आरटीपीसीआर तपासणीमध्ये २७२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्यावर्षीपासून आजपर्यंत तालुक्यात ६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ज्यांना लक्षणे नाहीत, व घरी वेगळे राहण्याची व्यवस्था आहे. अशा २२ रुग्णांना होम आयसोलेशनसाठी परवानगी देण्यात आली आहे. तर ज्यांना लक्षणे आहेत अशा रुग्णांना आंबेजोगाई येथे उपचार करण्यात येत आहेत. ज्या रुग्णांना कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत अशा रुग्णांना डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
१० हजार ३७२ नागरीकांचे लसीकरण पूर्ण
तालुक्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तीव्रता कमी करण्यासाठी शासनाच्यावतीने लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. मोहिमेच्या सुरुवातीला पहिल्या टप्प्यात कोरोना योध्दांना लस देण्यात आली. यानंतर ६० वर्षावरील व ज्यांना काही आजार आहेत, अशा नागरीकांना लस देण्यात आली. तर पुढच्या टप्प्यात ४५ वर्षे पूर्ण झालेल्यांना लस देण्यात येत आहे. शहरातील उपजिल्हा रुग्णालयात व तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात सिरसाळा, धर्मापुरी, नागापूर, मोहा, पोहनेर तर पाच उपकेंद्रात गोवर्धन हिवरा, बोधेगाव, कौडगाव हुडा, बेलंबा, सारडगाव याठिकाणी तालुक्यातील नागरीकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आजपर्यंत या सर्व केंद्रावर १० हजार ३७२ नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन या लसी देण्यात आल्या. तसेच तालुक्यातील पात्र नागरीकांनी न घाबरता जास्तीत जास्त लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन डॉ. मोरे यांनी केले आहे.
हेही वाचा - अवघ्या नऊ महिन्यांत अंधेरी रेल्वे स्थानकाच्या स्कायवाॅकचे काम पूर्ण