बीड : अंबाजोगाईमध्ये वही खरेदी करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर किराणा दुकानदाराने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात तिसरे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या.एम.बी.पटवारी यांनी आरोपीला दोषी ठरवून पाच वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा गुरुवारी (दि.१८) ठोठावली. शहरात चार वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. शेख सिराज शेख मुन्सी (२५,रा.मियाभाई कॉलनी, अंबाजोगाई) असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ वर्षीय पीडित मुलगी २३ मे २०१७ रोजी शेख सिराज शेख मुन्सी याच्या किराणा दुकानात वही आणण्यासाठी गेली होती. यावेळी शेख सिराजने तिला जवळ बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तेथे इतर ग्राहक आल्याने पीडितेची त्याच्या तावडीतून सुटका झाली. तिने रडत-रडत घर गाठले व सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी त्यास जाब विचारला तेव्हा त्याने जातिवाचक शिवीगाळ करुन उलट त्यांनाच धमकावले. या प्रकरणी शहर पोलिसांत शेख सिराज शेख मुन्सीवर बलात्काराचा प्रयत्न, विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध, ॲट्रॉसिटी या कमलान्वये गुन्हा नोंद झाला होता.
तत्कालीन उपअधीक्षक विशाल आनंद यांनी तपास करुन दोषारोपपत्र अंबाजोगाई येथील विशेष न्यायालयात दाखल केले होते. प्रकरणाची सुनावणी तिसरे जिल्हा व सत्र न्यालयायाच्या न्या.एम.बी.पटवारी यांच्यासमोर झाली. साक्षीपुरावे ग्राह्य धरुन आरोपीला विनयभंग, ॲट्रॉसिटी व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याखाली दोषी धरले. न्यायालयाने त्यास विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याखाली प्रत्येकी पाच वर्षे तर ॲट्रॉसिटीमध्ये एक वर्षे सक्तमजुरी सुनावली. या सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या असल्याने त्यास पाच वर्षे सक्तमजुरी तसेच २५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा मिळाल्याची माहिती सरकारी वकील रामेश्वर ढेले यांनी दिली.
सहा साक्षीदार तपासले..
या प्रकरणात सरकारी वकील रामेश्वर ढेले यांच्यातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित, तपास अधिकारी, पीडितेची आई यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सबळ पुराव्याअभावी आरोपीविरुध्द बलात्काराचा गुन्हा सिध्द होऊ शकला नाही. पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार अर्जुन चौधर व पोलीस अंमलदार पूनम राठोड यांनी ॲड. ढेले यांना सहाय्य केले.