बीड- 'औरंगाबादच्या जनतेने इतिहास घडवून इम्तियाज जलील यांना निवडून दिले. जलील यांनी तेथील प्रस्थापित शिवसेना नेत्याच्या सत्तेला सुरुंग लावला आता बीडमध्येही शेख शफीक शिवसेनेचा पराभव करून औरंगाबादची पुनरावृत्ती करतील,' असा विश्वास एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केला.
'या देशात माॅब लिंचींग नावाचा प्रकार नाही. तो पाश्चिमात्य देशातला आहे,' असे वक्तव्य संघ प्रमुख मोहन भागवत यांनी आज केले होते. त्याला उत्तर देत एमआयएमचे ओवैसी यांनी जोरदार टीका केली. 'आतापर्यंत झालेले हत्याकांड तुम्ही विसरलात का? या देशात धर्मनिरपेक्षता आहे का?,' अशा तीव्र शब्दात मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध त्यांनी केला.
बीड येथील इजतेमा मैदानावर मंगळवारी सायंकाळी बीड विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार शेख शफीक आणि माजलगाव मतदारसंघातील शेख अमर जैनोद्दीन यांच्या प्रचार सभेत ओवेसी बोलत होते. व्यासपीठावर माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मतीन, महेफुजुर रहमान, जिल्हाध्यक्ष शेख निजाम, उमेदवार शेख शफीक, शेख अमर यांच्यासह युवक जिल्हाध्यक्ष खयूम इनामदार, नगरसेवक शेख मतीन, हाफिज अश्फाक, समी, मोमीन अझहर, हरिसन फ्रांसिस, एजाज इनामदार उर्फ खन्नाभाई, शिवाजी भोसकर, सचिन गाडे, हाजी आयुब पठाण आदींची उपस्थिती होती.
'मजलिसला राजकिय वारसा आहे. त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. त्यामुळेच आज मजलिस सर्व समाजाची आवाज बनली आहे. आजही मजलिसवर आरोप होतो की, आम्ही मतांची विभागणी करण्यासाठी निवडणूक लढवितो. मात्र, आम्हाला 70 वर्षाच्या राजकीय प्रवासाचा इतिहास आहे. त्यामुळे मजलिस कोणाच्या मालकीची नाही ती सर्व सामान्यांच्या हक्कासाठी लढत आहे. त्यामुळेच आम्हाला यश मिळत आहे,' असे ओवैसी यांनी सांगितले.
'एमआयएम सेटिंग करते, असा आरोप आमच्यावर केला जातो. मात्र, नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, शरद पवार आपल्या सेटिंगचे काय गुपित आहे ? तेही मला एकदा सांगा,' असे खुले आव्हान ओवेसी यांनी दिले. 'आमच्यावर आरोप करणारे आता स्वतः संपू लागले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पिक्चर दी एन्ड होत असून या दोघांनाही आता भविष्य नाही. शरद पवार तुम्ही धर्मनिरपेक्ष आहात तर मग ट्रीपल तलाखच्या वेळी तुमची धर्मनिरपेक्षता कोठे होती? दिल्लीत एक आणि महाराष्ट्रात एक सेटिंग अखेर कुठपर्यंत तुम्ही मॅचफिक्सिंग करत राहणार?' असा सवाल ओवैसी यांनी शरद पवारांना केला.
ओवैसी यांनी तबरेज आणि मॉबलिंचिगच्या मुद्द्यावरुन भाजपवर जोरदार टीका केली. 'बीडमध्ये भूतबंगला आहे. ज्यांचे केवळ 800 मतदान आहे ते बीडवर राज्य करत आहेत. मी दुवाची एक फुक मारली तर या भूतबंगल्यातील सर्व भूत पळून जातील. जयदत्त क्षीरसागर आधी राष्ट्रवादीत होते त्यांनी शिवसेनेत उडी मारली त्यापाठोपाठ आधी आघाडी केलेले संदीप यांनीही राष्ट्रवादीत उडी मारली. हे दोघेही गुलाटी मास्टर आहेत. एका घरात सोबत राहतात, सोबत खातात आणि बाहेर येवून आम्हाला सांगतात तुमची सेटिंग आहे. खरी सेटिंग तर तुमचीच आहे,' असा आरोप ओवेसी यांनी केला. 'एक घर बीडचे भविष्य काय सुधारणार?, असा सवाल करत 'तुम्ही सर्व एक व्हा आणि मजलिसचा साथ द्या. शफीकला आमदार करा मग बघा भूतबंगल्याची काय अवस्था होते ती', असे सांगून बीडमध्ये शेख शफीक आणि माजलगावमध्ये शेख अमर यांच्या पाठीशी ताकद उभी करा. 21 ऑक्टोबर रोजी त्यांच्या पंतग या चिन्हांसमोरील बटन दाबून मजलिसच्या सोबत या,' असे अवाहन ओवैसी यांनी केले. यावेळी सय्यद मतीन, शेख शफीक, शेख निजाम, शेख अमर आदींची भाषणे झाली. या प्रचार सभेस एमआयएमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
एकाच घरावर दोन झेंडे -शफिक शेख
एमआयएमचे उमेदवार शेख शफीक म्हणाले, 'बीडमधील क्षीरसागर काका - पुतणे एक आहेत. त्यांनी आजपर्यंत समाजाला धोका देण्याचेच काम केले आहे. त्यांच्या एकाच घरावर दोन झेंडे आहेत. यावरुनच कोण कोणाला मॅनेज आहे ते स्पष्ट होते,' असे शफीक शेख यांनी सांगितले.
शफीकभाऊंसाठी मेहनत करुन दोन्ही क्षीरसागरांचे राजकारण संपवणार -शेख निजाम
'बीड मतदारसंघातून ओवेसी यांनी शफीकभाऊंना उमेदवारी दिली. मला तिकीट दिले नाही. मात्र, मी आणि शफीकभाऊ वेगळे नाहीत. आमच्यासाठी अध्यक्ष ओवेसी यांचा शब्द अंतिम आहे. म्हणूनच मी ही होकार दिला. 2016 मध्ये झालेल्या नगर पालिका निवडणूकीप्रमाणेच वातावरण आहे. शफीकभाऊंसाठी मेहनत करणार असल्याचे सांगून कोणात्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. दोन्ही क्षिरसागरांच्या राजकारणाचा धंदा बंद करा,' असे शेख निजाम यांनी सांगितले.