बीड- मराठवाड्यातील पीक परिस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे पिकांना जीवदान देण्यासाठी 22 जुलैनंतर कृत्रिम पाऊस पाडला जाणार आहे, अशी माहिती रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.
कृत्रिम पावसाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 22 जुलैनंतर येणाऱ्या ढगांमध्ये पाण्याची घनता जास्त असेल. त्यावेळी कृत्रिम पावसाचा प्रयोग निश्चित यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, धीर धरावा. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृत्रिम पावसाबाबत गांभीर्याने चर्चा झाली आहे. औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यातील तीन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. येथील केंद्रामध्ये कृत्रिम पावसाच्या यंत्रणेचे काम चालणार आहे, असे जयदत्त क्षीरसागर म्हणाले.
कृत्रिम पावासाच्या उपक्रमासाठी सरकारने 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 22 जुलैनंतरच्या ढगांमध्ये पाण्याची घनता जास्त असेल, असे हवामान खात्याने सांगितले आहे. मराठवाड्याप्रमाणेच विदर्भातही पीकस्थिती गंभीर आहे. मात्र, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, धीर धरावा, असे आवाहन क्षीरसागर यांनी केले आहे.