बीड - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्याकडे वळविण्यासाठी सरकारने राज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिली आहे. त्यासाठीच्या सर्व्हेक्षणाला देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
मंत्री झाल्यानंतर प्रथमच बीड येथे आल्यानंतर मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी 'बीडचा दुष्काळ भूतकाळ व्हावा' अशी अपेक्षा व्यक्त करत पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्याची गरज असल्याचे सांगितले होते. तसेच त्यासाठी राज्यसरकारकडे पाठपुरावा करून आग्रह धरू ,अशी भूमिका मांडली होती. तर आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
मराठवाड्याला सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागतो. तसेच पश्चिम अथवा उत्तर महाराष्ट्रातून मराठवाड्याला पाणी द्यायचे म्हटले की त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होतो. त्याचवेळी वैतरणा, टेम्भू अशा पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी मोठ्याप्रमाणावर समुद्रात वाहून जाते. त्यामुळे पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी अडवून, ते काही ठिकाणी लिफ्ट करून धरण आणि कालव्याच्या मदतीने मराठवाड्यातील धरणांमध्ये सोडण्याचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता.
तर हा प्रकल्पच मराठवाड्याच्या दुष्काळावरील उपाय आहे. त्यामुळे हा प्रकल्प व्हावा, यासाठी आपण आग्रही आहोत. तसेच याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्र्यांशी पाठपुरावा करणार आहोत, असे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मागील महिन्यात म्हटले होते. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविण्यासाठी राज्यांतर्गत नदीजोड प्रकल्प राबविण्यास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे दुष्काळी मराठवाड्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.