बीड - जिल्ह्यातील माजलगाव येथे रविवारी सायंकाळी रस्त्याने चालणार्या दोन महिलांवर मोकाट जनावरांनी हल्ला केला. यामध्ये एका महिलेच्या डोक्याला व गळ्याला गाईचे शिंग लागल्याने ती गंभीर जखमी झाली. तर सोबत असलेली महिलाही जखमी झाली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पुष्पाबाई साखरे, मुक्ताबाई भिसे आणि महबूब खान पठाण अशी जखमींची नावे आहेत.
हेही वाचा... ..तर अधिकाऱ्यांना दांडक्याने मारा; 'त्या' शेतकरी कुटुंबाला प्रवीण दरेकरांचा सल्ला
बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेच्या हद्दीत मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नियमाप्रमाणे मोकाट जनावरांना पालिका प्रशासनाने कोंडवाड्यात कोंडूने किंवा संबंधित मालकाकडे जनावरांना सुपूर्त करणे अपेक्षित असते. मात्र, बीड जिल्ह्यातील कित्येक पालिकांकडे कोंडवाडे नसल्याचे समोर येत आहे. परिणामी रहदारीच्या ठिकाणी मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणात वावर होत आहे.
त्यामुळेच माजलगाव येथे रस्त्याने चालत असलेल्या दोन महिलांवर मोकाट जनावरांनी हल्ला केला. यामध्ये एका महिलेच्या डोक्याला व गळ्याला गाईचे शिंग लागल्याने ती गंभीररित्या जखमी झाली आहे. दोन्ही महिलांवर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यात मोकाट जनावरांची समस्या अधिक वाढलेली दिसत आहे. मात्र, मोकाट जनावरांकडून नागरिकांवर सातत्याने हल्ले होऊनही पालिका प्रशासन कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही. तेव्हा माजलगावच्या घटनेनंतर मोकाट जनावरांवर अथवा त्यांच्या मालकांवर माजलगाव पालिका काय कारवाई करणार ? हा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.