बीड - शहरातील एका बियाणांच्या दुकानावर कृषी विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री छापा टाकून कापूस बियाण्यांच्या 46 बॅग जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात संबंधित दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती कृषी अधीक्षक राजेंद्र निकम यांनी दिली आहे.
बीड शहरातील व्यंकटेश अॅग्रो एजन्सी मालक केदारनाथ रमेशलाल जादू यांनी बीटी कापसाचे बोगस बियाणे शेतकऱ्यांना विकले आहे. बोलगार्ड ऐवजी बॉडीगार्ड अशा नावाची कापसाची बॅग विक्री केली जात होती. याबाबत एका शेतकऱ्याने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर कृषी विभागाकडे तक्रार केली होती. त्या शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार कृषी विभागाच्या पथकाने सापळा रचून व्यंकटेश अॅग्रो एजन्सीवर छापा टाकला. यामध्ये कापसाच्या बोगस 46 बॅग आढळून आल्याचे कृषी अधीक्षक राजेंद्र निकम यांनी सांगितले.
बोलगार्ड ऐवजी बॉडीगार्ड वापरले जाते नाव
मंगळवारी बीड शहरात कृषी विभागाच्या पथकाने छापा टाकून पकडलेल्या कापसाच्या बोगस बियाणाचे नाव बॉडीगार्ड असे होते. सापडलेला बोगस कापसाच्या बियाणांवर बॅच नंबर नाही. शिवाय वरून फोटो मुगाचा आहे व आतमध्ये कपाशीचे बियाणे आहे. शेतकरी दुकानदाराला बोलगार्ड मागतात. मात्र बोगस बियाण्यांची विक्री करणारे काही दुकानदार बोलगार्ड ऐवजी बॉडीगार्ड असे सम नाव असणारे बियाणे शेतकऱ्याला देतात. संबंधित बोगस बियाणे मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांमधून येत असल्याची शंका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर पक्की पावती देण्याऐवजी कच्ची पावती शेतकऱ्यांच्या हातावर टेकवली जाते. ही वस्तुस्थिती असल्याचे तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव म्हणाले.
जप्त केलेले बियाणे तपासणीसाठी प्रयोग शाळेला पाठविण्यात आले आहेत. या प्रकारामुळे बीड जिल्ह्यात बोगस बियाण्यांची विक्री करणारी एक टोळीच असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
'संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करा'
बीड जिल्ह्यात बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. हे सत्य आहे. हा प्रकार म्हणजे संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. त्यामुळे जे कोणी बोगस बियाणे विकताना सापडतील त्यांच्यावर मोक्का अंतर्गत म्हणजेच संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केली आहे.