बीड - शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करा, यासह विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्याकरिता बीडमध्ये गुरुवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, भारतीय खेत बदुर युनियन यांच्यावतीने बीड जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
मोदी सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. शेतकरी विरोधी कायद्ये पुढे रेटण्याचे कटकारस्थान मोदी सरकार कडून अनेक दिवसांपासून सुरू आहे. जे शेतकरी मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवतात, त्या आंदोलक शेतकऱ्यांवर दडपशाही देखील केली जात असल्याचे चित्र संपूर्ण देशभर आहे. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनही बळाच्या जोरावर दडपून टाकण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला. मात्र, आता शेतकरी तीव्र आंदोलनाच्या आंदोलनाच्या भूमिकेत असून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. नामदेव चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा- राज्यातील बॉलिवूड कुठेही जाण्याची शक्यता नाही - अनिल देशमुख