बीड - नव्या अर्थसंकल्पाच्या रूपाने बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याच्या विकासकामांना गती दिली आहे. बीड शहरातील व्हीव्हीआयपी विश्रामगृहाच्या नुतनीकरणाच्या ७.२६ कोटी रुपयांच्या आराखड्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. तसेच आष्टी तालुका न्यायालयाच्या इमारत बांधकामाच्या ७.१२ कोटी रुपयांच्या आराखड्यासही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
२६ जानेवारी २०२१ रोजी जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानात बीड जिल्हा वासीयांना संबोधित करताना धनंजय मुंडे यांनी कोविड विषयक नियम व आर्थिक निर्बंध जसेजसे कमी होतील. तसेतसे जिल्ह्यातील रखडलेले विकासकामे हाती घेऊन पूर्णत्वास नेण्यात येतील, असा शब्द दिला होता.
रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेणे व पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर-
त्यानुसार अर्थसंकल्पाचे सूप वाजताच धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेणे व पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर दिला आहे. बीड आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांनी बीड शहरातल्या शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरण संदर्भात मागणी केली होती. तर आष्टी-पाटोदा-शिरूरचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी आष्टी येथील न्यायालयास नवीन इमारत बांधण्याबाबत मागणी केली होती.
कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार-
त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बीड शहरातील व्हीव्हीआयपी विश्रामगृहाच्या नूतनीकरण कामाच्या ७ कोटी २६ लाख ८८ हजार रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच आष्टी तालुका न्यायालयाच्या नवीन इमारत बांधकामाच्या ७ कोटी १२ लाख ७७ हजार रुपयांच्या आराखड्यासही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच या दोनही कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार आहे.
हेही वाचा- अर्थसंकल्प पुण्याचा आहे का? नारायण राणेंची प्रतिक्रिया