बीड : बीड जिल्ह्यात एकूण 11 तालुके व 10 कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत. शनिवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बीड जिल्ह्यातील परळी, आंबेजोगाई, वडवणी, गेवराई व मिक्स बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, आज पाटोदा शिरूर संयुक्त कृषी उत्पन्न बाजार समितीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे लागले आहे.
तीन कृषी उत्पन्न बाजार समिती : बीड जिल्ह्यात भाजपच्या ताब्यात सध्या कडा कृषी उत्पन्न बाजार समिती, धारूर कृषी उत्पन्न बाजार समिती व केज कृषी उत्पन्न बाजार समिती या तीन कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत. मात्र आज होणारी मतदान प्रक्रिया व लगेच मतमोजणी होणार आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे लागले आहे, कारण ही कृषी उत्पन्न बाजार समिती गेले काही दिवसांपासून भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे ही कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात जाते की, भाजपच्या ताब्यात हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
कशी होणार निवडणूक : कृषी उत्पन्न बाजार समिती पाटोदाच्या 18 संचालक पदांच्या जागेसाठी आज सकाळी 7 ते 3 या वेळेत मतदान होत आहे. 18 जागेंसाठी 42 उमेदवार निवडणूकींच्या रिंगणात उतरले आहेत. या बाजार समितीसाठी सेवा सहकारी संस्था मतदार शंघाचे पाटोदा तालुक्यातील 389 तर शिरूर तालुक्यातील 475 मतदार आहेत. ग्रामपंचायत मतदार संघाचे पाटोदा तालुक्यातील 408 व शिरूर तालुक्यातील 310 मतदार आहेत. हमाल मतदार संघाचे 157, व्यापारी-आडते मतदार संघाचे 612 असे एकुण 2351 मतदार आहेत.
मतदान केंद्रातील 5 बुथ : या निवडणुकीच्या मतदानासाठी पाटोदा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मतदान केंद्रातील 5 बुथवर मतदान होत आहे. शिरूर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील मतदान केंदातील 2 बुथवर सेवा सहकारी संस्था मतदार संघ व ग्रामपंचायत मतदारसंघाचे मतदान होईल. तसेच शिरूर येथील हमाल, व्यापारी आडते मतदार संघाचे मतदान पाटोदा येथील बुथवर होईल. ही निवडणुक सुरळीत पार पडण्यासाठी सहाय्यक निबंधक सहकारी कार्यालयाच्या निवडणुक विभागाने मतदान प्रक्रियेसाठी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करून त्यांना निवडणुक प्रशिक्षण दिले आहे. सहायक निवडणूक निरीक्षक तहसीलदार रुपाली चौगुले मॅडम यांनी मतदान केंद्राची पाहणी केली आहे.
मतदान प्रक्रियेस सुरुवात : आज सकाळी 7 वाजेपासुन मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. पाटोदा व शिरूर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत चालू झाली अशी, माहीती श्री. एस. एम. केदार निवडणुक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पाटोदा यांनी दिली. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आज सायंकाळी 6 वाजता डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिका केंद्र नगर पंचायत शेजारी पाटोदा येथे मतमोजणी होणार आहे.