बीड - जिल्ह्यातील वैजाळा फाटा येथे भरधाव वेगात असलेल्या बोलेरो गाडीने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एकाच गावातील आठ जणांचा बळी गेला. वाहन चालकाने तोंडातील गुटखा थुंकण्यासाठी जीपचा दरवाजा उघडल्याने हा अपघात झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.
सोमवारी झालेल्या या अपघातात बोलेरो चालक वाचला आहे. भर दिवसा उभ्या ट्रकला बोलेरो धडकली कशी? असा प्रश्न उपस्थित होत होता. वाहन चालकाने तोंडात असलेला गुटखा थुंकण्यासाठी दार उघडले. त्यामुळे त्याचा बोलेरोवरील ताबा सुटून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली, असे या अपघातावेळी जीपच्या मागे प्रवास करणाऱ्या एका दुचाकीस्वाराने सांगितले.
हेही वाचा - औरंगाबादमध्ये रंगणार 'डायमंड कप इंडिया' आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा
या अपघातात निवडूंगवाडी येथील एकाच कुटूंबातील सात तर तांदळ्याची वाडी येथील एकाला आपला जीव गमवावा लागला. सतिष मुंडे हा वाहन चालवत होता. त्याचीच दारू सोडवण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. सुरूवातीला या अपघाताचे नेमके कारण समोर येत नव्हते. मात्र, आता तपासानंतर अपघाताची वेगळीच बाजू समोर आली आहे.
दोघे अत्यवस्थ...
या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. सई मुंडे ही पाच वर्षांची बालीका आणि सतिष मुंडे हा गाडीचा चालक दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. सईला सोमवारीच औरंगाबादच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. सतिष मुंडेवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवारी सतिष मुंडेलाही औरंगाबादच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. सईवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर सतिष मुंडे याच्या किडनीला मार लागल्याने त्यांचीही प्रकृती अत्यावस्थ आहे.