बीड - कंदुरीचे मटण खाल्याने 74 जणांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री शहरातील धानोरा रोड येथे घडली. विषबाधित 74 जणांची प्रकृती स्थिर असून नियंत्रणात असल्याची माहिती निवासी शल्यचिकित्सा सुखदेव राठोड यांनी दिली.
बीड शहरातील धानोरा रोड भागात मंगळवारी बाबासाहेब गोकुळे यांच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. याच दरम्यान कंदुरीचा कार्यक्रम आयोजित केला होता. जागरण गोंधळाच्या कार्यक्रमापूर्वी आलेल्या पाहुण्यांनी मटण व बाजरीची भाकर खाल्ली. मात्र, काही वेळानंतर एक दोघा जणांना मळमळ व उलट्या होऊ लागल्या. थोड्याच वेळात सात आठ जणांना हा त्रास सुरू झाला. हा प्रकार नेमका कशाचा आहे, हे कळत नव्हते. थोड्याच वेळात उर्वरित दहा ते पंधरा जणांना मळमळ होऊ लागल्याने बीड जिल्हा रुग्णालयात मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास 74 जण दाखल झाले.
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या अंदाजानुसार या 74 जणांना कंदुरीचे मटण व भाकरीतून विषबाधा झाली आहे. त्या मटणाचा व भाकरीचा नमुना अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तपासणीसाठी पाठवला होता. यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मेरेवार म्हणाले की, हा विष बाधेचा प्रकार नॉनव्हेज खाल्ल्यामुळे झाला आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून सोबतच विषबाधा झालेल्या रुग्णांचे जबाब देखील घेतले असल्याचे ते म्हणाले.
विषबाधा झालेल्या रुग्णांची नावे -
विलास लोंढे, बिभीषण भांडवलकर, महादेव जाधव, श्रीरंग गायकवाड गणेश कोठुळे, भाऊराव कोठुळे, सिद्धेश्वर जयते, इंद्रजीत वाघमारे, आसाराम जाधव, अविनाश श्रीराम, आनंद शिंदे, गणेश तुपे, विकी तांदळे, विलास कोरडे, अंकुश रोटे, प्रतीक सरवदे, संतोष खंडागळे यांच्यासह 74 जणांना कंदुरीच्या माध्यमातून विषबाधा झाली होती. सर्व रुग्णांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काही जणांना जिल्हा रुग्णालयातून सोडण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.