पुणे : इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ नेते आणि शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार धैर्यशील मोहिते, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षातील अनेक मोठे नेते उपस्थित होते. पक्ष प्रवेशानंतर हर्षवर्धन पाटील यांनी बारामती लोकसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं.
सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचंही योगदान : इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, "खासदार सुप्रिया सुळे आमच्या भगिनी आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे. सुप्रिया सुळे चार वेळा खासदार झाल्या आहेत. आधी तीन वेळा जेव्हा त्या खासदार झाल्या, त्यावेळी त्यांच्या विजयात थोडंफार का होईना, आमचंही योगदान होतं. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग होता."
जयंत पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा : "मी या पक्षात प्रवेश करण्यापूर्वी माझी आणि जयंत पाटील यांची जेव्हा जेव्हा भेट व्हायची, आमचं भेटणं किंवा बोलणं व्हायचं. आम्ही फोनवर बोलायचो. मला काही मिळावं म्हणून पक्ष प्रवेश केला नाही. तुम्ही जी जबाबदारी द्याल ती घेऊ. मी शब्दाचा पक्का आहे. राजकारण व्यक्तिगत स्वार्थासाठी करत नाही. कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्यामुळेच आज तुतारी हातात घेतली," असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.
विधानसभेत पाठवणं तुमचं काम : यावेळी शरद पवार म्हणाले की, "निवडणुकीत मला स्वत:ला उभं राहायचं नाही. जनतेनं मला 14 वेळा निवडून दिलं. त्यातल्या 7 वेळा इंदापूर तालुक्यातील जनतेनं मला मतं दिली. त्यामुळं आता मला स्वत:साठी काहीच मागायच नाही. मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेचं जीवन बदलायचं आहे. हे जर करायचं असेल, तर ज्यांच्याकडे कर्तृत्व, अनुभव, प्रशासन आहे अशाही लोकांची गरज आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी अशा लोकांना विधानसभेत पाठवणं हे तुमचं काम आहे आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम आहे."
आमदार दत्तात्रय भरणेंना कार्यकर्त्यांनी डिवचलं : हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी याेवेळी हातातील फलक उंचावत आमदार दत्तात्रय भरणेंना डिवचलं. मलिदा गँग हटवा, हर्षवर्धन पाटलांना विधानसभेत पाठवा. तालुक्यातील जनतेला शिव्या देणारा नको, तर आपुलकीनं वागवणारा आमदार हवा. इंदापूरला मलेजा घेऊन काम वाटणारा आमदार नको, बाप तो बाप रहेगा. असे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. आगामी काळात हर्षवर्धन पाटील समर्थक आणि दत्तात्रय भरणे समर्थकांत इंदापुरात राजकीय संघर्ष तापणार असल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा
- 'लाडकी बहीण योजने'वरुन संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले... - Sanjay Raut On Ladki Bahin Yojana
- कोल्हापुरामध्ये महायुतीत धुसफूस वाढली, उत्तरनंतर दक्षिणेत शिवसेनेनं थोपटले 'दंड' - Kolhapur Assembly Election
- सर्वात मोठी खेळी! शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अख्खा पक्षच विलीन - BRS NCP Sharad Pawar