बीड - कोरोना विषाणूशी लढा देणाऱ्या यंत्रणेमध्ये महाराष्ट्र पोलीस 24 तास सेवा देत आहेत. बंदोबस्तादरम्यान अनेक पोलिसांना जेवायला घरी जाणंदेखील अशक्य झालं आहे. अशा बंदोबस्त करत असलेल्या 300 पोलिसांना बीडमध्ये 72 वर्षीय माऊली जेवण बनवून देण्याचे काम करत असून तिच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बीड येथील निलावती जगताप यांच्या घरी. बीड शहरातील विविध ठिकाणी दिवस-रात्र कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना त्या ठिकाणी जेवणाचा डब्बा मिळावा म्हणून 72 वर्षाच्या निलावती जगताप पुढे सरसावल्या आहेत. दररोज न चुकता त्या त्यांच्या घरात तयार केलेल्या स्वयंपाक घरात येतात आणि आपल्या तीन सुनांसमवेत तब्बल तीनशेहुन जास्त डब्बे तयार करतात. जेव्हापासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे, त्या दिवसापासून निलावतीबाई यांचं संपूर्ण कुटुंब पोलीस बांधवासाठी एकत्र येऊन स्वतःच स्वयंपाक बनवत आहेत.
सुरुवातीला फक्त 80 डब्याचा स्वयंपाक केला जायचा. मात्र, आता तीनशे पेक्षाही जास्त डब्बे पोलीस बांधवाना पुरवले जात आहेत. या कामात निलावती बाईंच्या तीनही सुना मदत करत आहेत, हे विशेष. दररोज रुचकर जेवण तर बनविले जातेच. मात्र, उद्या काय पौष्टिक जेवण द्यायचे यावर संपूर्ण कुटुंब एकत्रित बसून विचार मंथन करत त्यावर अंमल करतात. पोलिसांना पोटभर जेवण देण्याची संकल्पना निलावतीबाई यांचीच असून त्यांचे तीन मुलं स्वतः हे डब्बे पोलिसांना पोहचवतात. 80 डब्यावरून सुरू झालेला हा प्रवास आज 300 हुन जास्त डब्यांच्या वर गेला आहे. संकट काळात सर्वच मदतीसाठी धावून येतायेत, मात्र रणरणत्या उन्हात कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिसांना पौष्टिक आणि गरमागरम जेवण मिळावे, हाच उद्देश जगताप कुटुंबांचा आहे. सेवाभाव एवढाच उद्देश असल्याचे जगताप कुटुंबिय सांगतात.
कोरोना नावाच्या महाभयंकर रोगाने देशालाच नाही, तर संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात आणि गावखेड्यातही स्म:शान शांतता पाहायला मिळतेय. गेल्या अनेक दिवसांपासून उन्हातान्हात महाराष्ट्र पोलीस कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून खडा पहारा देत आहेत. त्याच ठिकाणी त्यांना आता जेवणदेखील मिळत असल्याने बीडच्या पोलीस कर्मचाऱ्यांना सध्या तरी मोठा आधार मिळाला आहे हे मात्र निश्चित..!