बीड - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या आठ जागांसाठी शनिवारी झालेल्या मतदान प्रक्रिये दरम्यान परळीत भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले. त्यामुळे निवडणुकीला गालबोट लागले. दरम्यान, जिल्ह्यात आठ जागांसाठी ५८.३२ टक्के मतदान झाले. रविवारी मतमोजणीनंतर निकाल घोषित होईल. भाजपच्या माघारीमुळे निवडणुकीत चुरस दिसली नाही. परंतु, राजाभाऊ मुंडे यांची मतदान केंद्रावरील हजेरी व परळीत भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत टोकाला गेलेला वाद यामुळे निवडणूक रंगतदार वळणावर पोहोचली आहे.
भाजपची माघार -
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सेवा संस्था मतदारसंघातील ११ जागांवरील सर्वच उमेदवार अपात्र ठरल्याने निर्माण झालेला ट्विस्ट अखेरपर्यंत कायम राहिला. निवडणूक प्रक्रियेवर बहिष्काराची घोषणा करत ऐनवेळी भाजपने माघारीची खेळी खेळली. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने मात्र जोरदार तयारी केली होती. गुरुवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये समर्थकांशी संवाद साधून रणनीती आखली होती तर शुक्रवारी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत माघार घेणे पसंद केले होते.
दरम्यान, परळीतील औद्योगिक वसाहत या एकमेव केंद्रावर शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानासाठी अंतिम मुदत होती. मात्र, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुदत संपल्यानंतर काही मतदार आणल्याचा आरोप करत भाजपने विरोध केला. त्यावरून दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. खुर्च्यांची फेकाफेक करुन अर्वाच्च शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर लगेचच माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी तिथे धाव घेत शांततेचे आवाहन केले. रविवारी मतमोजणीनंतर निकाल घोषित होईल. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या आठ जागांसाठी मतदान-
सेवा संस्थांमधील ११ जागांवर एकही उमेदवार पात्र न राहिल्याने केवळ आठ जागांसाठी मतदान झाले. यात ओबीसी, विमुक्त जाती, अनुसूचित जाती, इतर शेती, प्रक्रिया संस्था, पतसंस्था /नागरी बँका या मतदारसंघात प्रत्येकी एका जागेसाठी तर महिला मतदारसंघात दोन जागांसाठी ११ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली.
केंद्रनिहाय मतदार व झालेले मतदान-
केंद्राचे नाव-मतदारसंख्या-मतदान-टक्केवारी
बीड ३१२ १७० ४५.४९
शिरुर ८५ ५३ ६२.३५
पाटोदा ६० ३२ ५३.३३
आष्टी १७५ ५६ ३२.००
गेवराई १७९ १६५ ९२.१८
माजलगाव ७७ ७३ ९४.८१
धारुर ५७ ३४ ५९.६५
वडवणी ९१ ३२ ३५.१६
परळी ११८ ५६ ४७.४६
अंबाजोगाई ११४ ८३ ७२.८१
केज ११४ ५२ ४५.६१
एकूण १३८२ ८०६ ५८.३२