बीड : नेहमी निसर्ग संकटात सापडलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकरी, आत्महत्येला कवटाळत असल्याने गतवर्षीपेक्षा यावर्षी शेतकरी आत्महत्याच्या संख्येत धक्कादायक अशी वाढ झाली आहे. आसमानी आणि सुलतानी संकटाने इथला शेतकरी हतबल झाला आहे. सततची नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा तर आता अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी होत ( Heavy rains destroyed dreams of farmers ) आहे. त्यामुळं शेतकरी आत्महत्येकडे पाऊल उचलत आहे.
जपलेली पिकं गुडघाभर पाण्यात : दुष्काळी बीड जिल्ह्यामध्ये गतवर्षीपासून परतीचा पाऊस कहर करत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह जमिनी वाहून गेल्या आहेत. शेतातील उभी पिकं नेस्तनाबूत झाल्यानं शेती उजाड झाली आहे. यामुळं पुढील अनेक वर्ष शेती पीकाऊ होते की नाही ? यावर देखील प्रश्नचिन्ह उभा ठाकला आहे. तर शेकडो एक्करमध्ये तळहाताच्या फोडासारखी जपलेली पिकं गुडघाभर पाण्यात अडकली आहेत. यामुळं सोयाबीनची माती अन कापसाच्या वाती झाल्या आहेत. असे एक ना अनेक संकट शेतकऱ्यांपुढे उभे असताना, सरकार अन शासनाची शेतकऱ्यांविषयी असलेली उदासीनता, यामुळं शेतकरी हतबल झाला आहे. याच नैराश्यातून बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरु आहे.
कोणत्या महिन्यात किती शेतकरी आत्महत्या : बीड जिल्ह्यात 2021 या गतवर्षी तब्बल 210 शेतकरी आत्महत्येची नोंद शासन दरबारी आहे. तर यंदाच्या 2022 च्या जानेवारी ते आक्टोबर महिण्यात 211 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी पात्र 137 तर अपात्र 39 असून उर्वरित प्रलंबित 35 अर्ज प्रलंबित आहेत..
जानेवारी | 18 |
फेब्रुवारी | 24 |
मार्च | 29 |
एप्रिल | 15 |
मे | 22 |
जून | 30 |
जुलै | 17 |
ऑगस्ट | 23 |
सप्टेंबर | 18 |
आक्टोबर | 15 |
एकुण | 211 |
अशी धक्कादायक आकडेवारी गेल्या 10 महिन्यातील आहे.
शेतकरी झाला दोलायमान : राज्यामध्ये पेट्रोल डिझेल आणि गॅस याच्या वाढलेल्या किमती, तर मराठवाड्यात कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे मराठवाड्यातील हा बीड जिल्हा येथील शेतकरी सतत या त्रासाला सामोरे जात आहे. शेतकऱ्याच्या दृष्टीने जर विचार केला तर त्याच्या कडली येणारी आवक आणि होणार उत्पन्न याचं तुलनात्मक निवारण घडलं जात नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक दोलायमान होतो. ही आताची परिस्थिती नाही तर गेल्या काही दिवसापासून ही परिस्थितीमध्ये वाढ होत चाललेली आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान पाऊस कमी झाला आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात आलेली पिकं नेस्तनाबूत झाली. त्यामुळे शेतकरी खचला जातो आणि शेतकऱ्यांच्या पिकाला नसलेला हमीभाव आणि सरकारची असलेली अनस्ता त्यामुळे शेतकरी दोलायमान झाला आहे.
शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव दिला पाहिजे : ऐन दिवाळीच्या तोंडावर, या पद्धतीचा अवलंब केला, त्याची कारण आर्थिक टंचा हीच आहेत. प्रशासनानं सरकारनं कुठेतरी त्याला सहकार्य करणे आणि आधार देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. शेतकऱ्याची गरज जोपर्यंत भागत नाही तोपर्यंत शेतकरी असेच टोकाचे पाऊल उचलत राहणार आहे. तोपर्यंत सरकार आणि शेतकरी याच्यातून बाहेर पडणार नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना हमीभाव दिला पाहिजे. जाहीर केलेली मदत ही वेळेत मिळाली पाहिजे. आता झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे होणार इथून पुढे सर्वांची बैठक होणार आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळणार त्यामध्ये तब्बल एक वर्ष उलटून जातो.
प्रशासकीय मदत मिळणे गरजेचे : शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, त्याच्यामुळे शेतकरी उचला जातोय आणि त्याच्या हक्काची जी गोष्ट आहे ती त्याला मिळत नाही. महागाईमुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. त्याचा दैनंदिन खर्च त्याच्या मुलाबाळांचा खर्च हा त्याला पेलावत नाही, या दोन्ही प्रक्रियेमुळे तो टोकाचे पाऊल उचलतो, शेतकऱ्यांचे बॅलन्स शीट आहे त्यामध्ये त्याची येणारी आवक आणि होणारा खर्च यांचा त्याला ताळमेळ बसत नाही, जोपर्यंत त्याचा कारण बसत नाही तोपर्यंत शेतकरी पिकलेलाच राहील, शेतकऱ्याला सहकार्य करण्याची प्रशासनाची आवश्यकता आहे. प्रशासकीय मदत मिळणे गरजेचे आहे. शेतातून निघणाऱ्या मालाला योग्य भाव देणे हे सरकारचं काम आहे. आवर्षणाच्या वेळी त्याला पाणी देणे, जेव्हा अतिरिक्त पाणी होईल तेव्हा त्याला मदत करणे, करायला वेळेच्या अगोदर मदत करणे गरजेचे आहे.
अस्मानी अन सुलतानी संकटाशी सामना : बीड जिल्ह्यातील शेती ही संपूर्ण पावसावर अवलंबून आहे आणि त्यामुळे पाऊस जर नसेल तर शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देता वेळेस आकडता हात घेतात. बँकांना दिलेलं टार्गेटही पूर्ण होत नाही, त्यामुळे शेतकऱ्याला पर्यायाने खाजगी सावकाराकडे जावं लागतं, शेतकरी देशोधडीला लागत आहे. असे साहेबराव परजणे म्हणाले. तर बाजीराव ढाकणे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी अन सुलतानी संकटाशी सामना करतांना हतबल होत आहे.