बीड - माजलगाव येथे 21 लाख 60 हजार रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास केली आहे. परराज्यातून मोठ्याप्रमाणात बीड जिल्ह्यामध्ये गुटखा विक्रीसाठी आणला जातो.
जिल्ह्यातील माजलगाव येथून एका ट्रकमध्ये गुटखा जात असल्याची माहिती विशेष पथकास मिळाली. त्यानुसार माजलगाव ग्रामीण क्षेत्रामध्ये संबधीत गाडी अडवण्यात आली. सदरील गाडीमध्ये 30 पोते गुटखा सापडला आहे. या मालाची किंमत 21 लाख 60 हजार रुपये आणि वाहनाची किंमत 5 लाख असा एकूण 26 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.
या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख अभिजित आडके, गणेश नवले, शमीम पाशा, राठोड यांनी केली.