बीड - कापूस वेचणीसाठी गेलेल्या महिलेचा गळा आवळून तसेच डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना शुक्रवारी साळेगाव येथे उघडकीस आली होती. या घटनेनंतर मारेकरी पसार झाले होते. महिलेवर खुनापूर्वी दोघांनी सामूहिक अत्याचार केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. यानंतर दोन आरोपींना पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या आहेत. पंकज भगवान जाधव (२३), अजय उर्फ धनू दत्ता इंगळे (२२, दोघे रा. साळेगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
काय आहे प्रकार?
पीडित 28 वर्षीय महिला शुक्रवारी सकाळी शेतात कापूस वेचणीसाठी गेली होती. पीडित महिला कापूस वेचणी करत होती तेंव्हा तेथे पंकज जाधव हा आला. त्याने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर त्याने आधीच सांगितल्याप्रमाणे मित्र अजय इंगळे तेथे पोहोचला. त्यानेही तिच्यावर अत्याचार केला. यावेळी पीडितेने आरडाओरड करुन घडला प्रकार पतीला सांगणार असल्याचे म्हटले. पतीला हा प्रकार कळाल्यावर भंडाफोड होईल, या भीतीने त्यांनी सुरुवातीला तिला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती पतीला सांगण्यावर ठाम राहिल्याने चिडलेल्या दोघांनी तिचा साडीने गळा आवळला व डोक्यात दगड मारुन तिला संपविले.
सकाळी 10 वाजता या महिलेचा कापसाच्या शेतात विवस्त्र मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाजवळ अंगावरील साडी, विस्कटलेला कापूस, मोबाइल, स्कार्फ, विळा, जेवणाचा डब्बा, बूट, कानातील दागिना व केसातील पीन व गुटख्याची रिकामी पुडी आढळून आली होती. या घटनेनंतर उपअधीक्षक सुरेश पाटील, गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत, केज ठाण्याचे निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, उपनिरीक्षक श्रीराम काळे आणि दादासाहेब सिध्दे यांनी भेट दिली होती. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता.
दरम्यान, मृतदेह विवस्त्र आढळल्याने पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला. घटनेनंतर पंकज जाधव, अजय इंगळे हे दोघे गायब असल्याचे समोर आले. त्यामुळे संशयाची सूई त्यांच्याकडे वळाली. गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत यांनी तपासचक्रे गतिमान करुन अजय इंगळे, पंकज जाधव यांना गावातून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा, अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत, पोलीस अंमलदार बालाजी दराडे,हनुमान खेडकर, मनोज वाघ, प्रसाद कदम, राहुल शिंदे,चालक संजय जायभाये यांनी केली.
मोबाईलमध्ये छेडछाड -
पीडित महिला कापूस वेचणीसाठी पंकज जाधव याच्या शेतात गेली होती. तिच्यावर अत्याचार करून खून केल्यानंतर दोघांनीही तेथून पोबारा केला. मात्र, काही वेळाने पंकज जाधव पुन्हा तेथे आला. त्याने पीडितेच्या मोबाइलवर स्वत:च्या मोबाइलवरुन मिस्ड कॉल केला. आपण तिला कॉल करत होतो, असे भासवून या प्रकरणाशी संबंध नसल्याचा कांगावा करण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक पुराव्याआधारे तसेच घटनास्थळी आढळलेल्या गुटख्याच्या रिकाम्या पुडीवरुन मारेकऱ्यांचा छडा लावला.