बीड- मागील चार दिवसांपासून परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात थैमान घातले आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कायम दुष्काळी परिस्थिती असते. मात्र, यंदा समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. यामध्ये आष्टी तालुक्यातील बेलगावचा तलाव गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच ओव्हरफ्लो झाला आहे. आजघडीला जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पांमध्ये ८३ टक्के पाणीसाठा जमा झाले आहे, अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या साप्ताहिक अहवालात देण्यात आली.
राज्यभरात सध्या परतीच्या पावसाने जोर धरला आहे. पावसाने बीड जिल्ह्याला देखील झोडपले असून, जिल्ह्यातील सर्वच लहान मोठी धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. जिल्ह्यात लघू व मध्यम प्रकल्पांची संख्या ही १४४ एवढी आहे. यामध्ये माजलगाव प्रकल्प १०० टक्के भरला असून, मांजरा प्रकल्प ७७ टक्के भरला आहे.
दुष्काळी पट्टा असलेल्या आष्टी तालुक्यातील बेलगावचा तलाव परतीच्या पावसामुळे १०० टक्के भरला आहे. मागील ५ वर्षांपासून हा तलाव भरत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते. यंदा मात्र तलाव भरल्याने लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच, तलाव भरल्याने आष्टी शहर आणि जवळपासच्या अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटला आहे.
हेही वाचा- ईटीव्ही भारत स्पेशल : बीडमध्ये वन्यजीवांना मायेची उब देणारे 'सिद्धार्थ-सृष्टी'