बीड - जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने शनिवारी पाठवण्यात आलेल्या 136 जणांचे कोरोना चाचणी अहवाल रविवारी निगेटिव्ह आले. तात्पुरता का होईना बीडकरांना या अहवालामुळे दिलासा मिळाला आहे.
मागील आठवड्यात बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. यातच हैदराबाद येथून प्रवास करून बीडमध्ये आलेल्या एका कुटुंबामुळे जिल्हा आरोग्य विभागावर ताण वाढला होता. शनिवारी आरोग्य विभागाच्या वतीने 136 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. याचा अहवाल रविवारी सायंकाळी बीड जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाला, असून सर्वच्या सर्व अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
जिल्ह्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्वॅब देखील तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सदरील अहवाल आल्यानंतर प्रशासनाने व जनतेने सुटकेचा निश्वास सोडला. मध्यंतरी चार-पाच दिवस रोज नवीन रुग्ण सापडत असल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरत चालले होते. मात्र, रविवारी पाठवण्यात आलेल्या 136 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे तात्पुरती का होईना चिंता दूर झाली आहे.
आज घडीला बीड जिल्हा रुग्णालयात दहा कोरोना रूग्णांवर उपचार सुरू असून 64 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन त्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे. रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या समाधानकारक असल्याचे पाहायला मिळत आहे.