औरंगाबाद - राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत आहे. औरंगाबादसारख्या जिल्ह्यांमध्ये आता उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णलयात जागा शिल्लक राहिली नसल्याचे चित्र आहे. उपचार करण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत औरंगाबादच्या पळशी गावात एका गावकऱ्याने आपलं घर अलगीकरण कक्ष म्हणून दिले आहे. त्याठिकाणी सर्व सोय करण्यात आली आहे.
किरण डोरले, असे या तरुणाचे नाव असून त्याने आपलं चार खोल्यांचं घर संशयित रुग्णांच्या अलगीकरणासाठी तयार केले आहे. या घरात रुग्णांसाठी जमिनीवरच सहा फुटांचे अंतर ठेवून गाद्या टाकण्यात आल्या आहेत, तर पिण्याचे पाणी, चहा, नाष्टा आणि भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. सज्ज करण्यात आलेले हे अलगीकरण कक्ष फक्त गावातील नागरिकांसाठी आहे, अशी माहिती किरण डोरले यांनी दिली.
जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांच्या कुटुंबातील व्यक्तींना अलगीकरण कक्षात ठेवणे गरजेचे असते. मात्र, मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये घर जास्त मोठे नसल्याने सुरक्षित अंतर ठेवणे शक्य होत नाही. त्यात कुटुंबातील इतर सदस्यांना बाधा होण्याची शक्यता बळावते. अशा परिस्थितीत महानगरपालिका किंवा शासकीय स्तरावर व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, ही व्यवस्था शहरी भागात मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. प्रत्येक गाव पातळीवर ही व्यवस्था अद्याप झाली नाही. त्यामुळे अनेक गावात ग्राम पंचायतीतर्फे काही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम पिसादेवी गावातील किरण डोरले यांनी केले.
किरण सध्या दुसऱ्या गावात राहत असल्याने पिसादेवी येथील त्याचे चार खोल्यांचे घर रिकामे आहे. या घरात संशयित रुग्णांचे अलगीकरण शक्य असल्याने त्यांनी तशी तयारी केली. घरात असलेली किरकोळ दुरुस्तीची कामे करून तीन खोल्यांमध्ये जमिनीवर सहा फुटांचे अंतर ठेवून गाद्या टाकण्यात आल्या आहेत. घरात पाण्याची व्यवस्था, चहा नाष्टा आणि भोजन देता येईल याची सर्व सोय केली आहे. अलगीकरण कक्षात हँडवॉश, सॅनिटायझर अशा बाबींची सोय करण्यात आली आहे. भविष्यात गरज पडली, तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळेत मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यासाठी देखील मदत करणार असल्याचे किरण डोरले या तरुणाने सांगितले. किरणसारखे प्रयत्न इतर गावात झाले, तर निश्चित संशयित रुग्णांना उपचार करणे शक्य होणार आहे हे नक्की.