औरंगाबाद - पडेगाव पॉवर हाऊसजवळ झुडपांमध्ये एका तरुणाचा मृतदेह सापडला. हा २३ वर्षांचा तरुण असून बेदम मारहाण करत धारदार शस्त्राने भोसकून त्याची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. मोहम्मद अझहर मोहम्मद हनिफ असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.
पडेगाव पॉवर हाऊसजवळील मोकळ्या जागेत सकाळी काही नागरिक प्रात:विधीसाठी गेले असता एक विवस्त्र तरुण जखमी अवस्थेत झुडुपात पडलेला दिसला. ही माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली. पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे यांच्यासह फॉरेन्सिक तपासणी पथक, श्वान पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा - मराठा समाजाला आठ दिवसात न्याय द्या; अन्यथा.., मराठा आरक्षण याचिकाकर्त्याचा इशारा
मृतदेहाची पाहणी केली असता डोक्याच्या पाठीमागील भागात गंभीर जखम, कंबरेत धारदार शस्त्र भोसकल्याचे आणि गुडघ्याला व हाता-पायांना बेदम मारहाणीचे व्रण आढळून आले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात हलविले. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. मृत अझहर हा पहाटे तीन वाजता घरी आला होता आणि रोहनकडे जाऊन येतो, असे घरच्यांना सांगून घराबाहेर पडला. मात्र, तो घरी आलाच नाही. सकाळी त्याच्या मृत्यूची बातमी घरच्यांना कळली.