औरंगाबाद - दिवाळीचा बोनस दिला नाही म्हणून एका कामगाराने 50 वर्षीय लेबर काँट्रॅक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये काँट्रॅक्टरचे दात पाडले आहेत. या प्रकरणी बाळू पठारे (मारहाण करणारा कामगार, रा.गांधीनगर, ब्रिजवाडी) याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
चिकलठाणा एमआयडीसी भागातील उत्तरानगर भागात ही घटना घडली. भीमा चंद्रदेव जोशी (वय - 50, रा.लेबर कॉलोनी), असे जखमी मालकाचे नाव आहे. दिवाळीच्या काळात कामगारांना बोनस देण्याची प्रथा आहे. मालकाकडून स्वखुशीने कामगारांना बोनस दिला जातो. आरोपी बाळूने देखील जोशी यांना बोनसची मागणी केली होती. मात्र, जोशी यांनी आता नाही नंतर बोनस देतो, असे म्हटल्याने बाळूला राग आला. राग अनावर झाल्याने त्याने जोशींना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या तोंडावर जोराचा ठोसा मारला. यामध्ये जोशी यांचे दात पडले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.