छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. त्यांना जाण्याची सोय व्हावी याकरिता नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी होत आहे, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी सोबतच वेरूळ लेणी देखील इथून जवळ आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांची सोय व्हावी यासाठी जालना-जळगाव असा 174 किलोमीटरचा रेल्वे मार्ग प्रस्तावित केला आहे. त्यासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. साडेसात हजार कोटी रुपयांचा निधी यासाठी लागणार आहे. त्यात राज्य सरकारचा 50 टक्के वाटा आहे. त्याला देखील मंजुरी मिळत असून, तसे आदेश मिळताच केंद्राला प्रस्ताव पाठवला जाईल आणि मंत्रिमंडळात तो मंजूर करून घेतला जाईल अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. तर यात 140 किलोमीटर अंतर हे जालना जिल्ह्यातून असेल, काम करताना आमदार आणि लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन हे काम पूर्ण करू, असे देखील दानवे यांनी सांगितले.
कामात गोपनीयता : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी या कामाबाबत आपल्या परीने प्रयत्न सुरू केले आहेत. काम होत असताना तीन राज्यांचा संपर्क यानिमित्ताने होईल. त्यासाठी सुरुवातीला हवाई सर्वेक्षण पण झालेले आहे. राज्य सरकारने अर्धे पैसे द्यायचे वचन दिलेले आहे; मात्र काम करताना शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करताना कोणताही व्यापारी मध्ये येणार नाही याची काळजी घेतली जात आहे. रेल्वे स्थानक आणि त्याचा मार्ग कसा असेल याबाबत गोपनीयता ठेवली आहे. काम करताना थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मोबदला जाईल याबाबत काळजी घेणार असून, या मार्गाचा निश्चित उपयोग होईल असे मत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
रस्ता रखडला रेल्वे कधी : छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा हा 110 किलोमीटरचा मार्ग, त्याच्या रस्ता रुंदीकरणाचे काम पाच वर्षांपूर्वी सुरू झाले. मात्र, ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी अद्यापही काम सुरू असून आणखी एक वर्ष तरी हे काम पूर्ण होईल अशी शक्यता नाही. त्यात आता नवीन रेल्वे सुरू होणार असल्याची घोषणा केली. ती देखील जालन्यावरून... मुळात येणारे पर्यटक ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद येथे येत असताना हा मार्ग जालन्याहून कशासाठी असा प्रश्न अनेक व्यावसायिकांनी उपस्थित केला. शहरात बीबी का मकबरा, पानचक्की, दौलताबाद किल्ला, वेरूळ लेणी अशी पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पर्यटक शहरात येतात. त्यावेळी अजिंठाला जाण्यासाठी पर्यटक जालन्यावरून जातील कसे? फक्त रेल्वे विभागाचे मंत्री म्हणून खासदार रावसाहेब दानवे आपला मतदार संघ असलेल्या जालना येथून रेल्वे सुरू करत आहेत का? असा प्रश्न उपस्थितीत होतोय.
अजिंठा येथे उभारणार शिवरायांचे स्मारक : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार असल्याचे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. लेणी पाहण्यासाठी 67 देशांचे पर्यटक येत असतात. यावेळी महाराजांचे संघर्षमयी जीवन समाजाला कळावे, पर्यटकांच्या माध्यमातून ते विदेशातही जावे. यासाठी हा प्रयत्न असून हे भव्य स्मारक लवकरच अजिंठा लेणी परिसरात उभारले जाईल. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा परिचय देखील व्हावा यासाठी देखील सुसज्ज असे काम परिसरात होईल. या निमित्ताने राज्यातील महापुरुषांच्या कामाची प्रचिती विदेशी पर्यटकांना आणि त्यांच्या देशाला होईल, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.