औरंगाबाद - पैठण तालुक्यात असणारे जायकवाडी धरण हे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या मेहनतीचे फळ असल्याचे मत माजी विधानसभा अध्यक्ष तथा भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले. केंद्रात आणि राज्यात काम करत असताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवल्याचे बागडे यांनी सांगितले.
शंकरराव चव्हाण हे औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील दाधेगावचे मूळ रहिवासी. मात्र, त्यांच्या शिक्षणासह वकिलीही नांदेडमध्ये झाली. त्यामुळे ते तिकडेच स्थायिक झाले. शंकरराव चव्हाण यांनी केलेली कामे लक्षात राहतील अशी होती. विशेषतः शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेलं काम उल्लेखनीय असल्याची भावना हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत आहे. त्यांची आठवण करत असताना औरंगाबादच्या पैठण येथील जायकवाडी धरणाचे नाव निघणार नाही असं होणार नाही. मराठवाड्यातील औरंगाबाद शहर आणि नांदेडपर्यंतच्या अनेक खेड्यांना जलसंजीवणी देणारे धरण म्हणून जायकवाडी धरणाचं नाव घेतलं जातं. हे धरण फक्त आणि फक्त शंकरराव चव्हाण यांच्यामुळे अस्तित्वात आले. शंकरराव चव्हाण यांच्या पाठपुरव्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण निर्माण झालं. या धरणामुळे औरंगाबाद जिल्ह्यात मुबलक पाणी यायला सुरुवात झाली आणि औद्योगिक वसाहत हळूहळू आपले पाय रोवू लागली. मुबलक पाण्यामुळे येथील औद्योगिक वसाहत जगातिक पातळीवर जाऊन पोहोचली. इतकंच नाही तर मराठवाड्यातील अनेक गावांच्या सिंचनाचा प्रश्न सुटल्याचे बागडे म्हणाले.शंकरराव चव्हाण यांनी सिंचनाबाबत विशेष काम केलं. शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी पाठपुरावा केला. केंद्रात आणि राज्यात काम करत असताना लक्षात राहतील, अशी काम त्यांनी केली. त्यांच्या कामांचा त्यांनी ठसा उमटवला, अशी भावना व्यक्त करत माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांनी आदरांजली वाहिली.