मुंबई - लॉकडाऊन दरम्यान बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर हल्ला केल्याचे प्रकार निदर्शनास आल्यास दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशा कृत्यांमध्ये सहभागी होणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
बिडकीन येथील औरंगाबाद-पैठण रोडवरील प्रकाश नगरमध्ये मुस्लीम समाजातील काहीजण धार्मिकस्थळी सामूहिक नमाज पठण करत असल्याची माहिती बिडकीन पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नमाज पठण करणाऱ्या लोकांची विचारपूस केली असता, जमावाने थेट हल्ला चढवत दगडफेक सुरू केली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, सहायक फौजदार बाबासाहेब दिलवाले, पोलीस नाईक सोनवणे मेजर जखमी झाले होते, या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी आज प्रतिक्रिया दिली.
पोलीस प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्स राखण्यासाठी चोख काम करत आहे. मात्र, पोलिसांवरच असे हल्ले केले जात आहेत. गृहमंत्रालय अशा घटनांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले असल्याचे देशमुख म्हणाले.
आतापर्यंत राज्यातील काही भागात पोलिसांवर हल्ल्याच्या 159 घटनांमध्ये 535 लोकांना अटक करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.