औरंगाबाद - कोरोना काळात आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कसं काम करतात ते सर्वांनीच पाहिलं. त्यात लसीकरण करून घेण्यासाठी आता आरोग्य कर्मचारी मेहनत घेत असून पुराच्या पाण्यातून कर्तव्य बजावणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा व्हिडिओ आता चर्चेचा विषय झाला आहे. मीना बुट्टे असे या आरोग्य सेविकेचे नाव आहे.
कर्तव्य बजावण्यासाठी पुराच्या पाण्यातून काढली वाट -
शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे अनेक गावांना पुराचा वेढा बसल्याचे दिसून आले. रस्त्यांवर, पुलांवर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले, वाहतूक बंद झाली अशा परिस्थितीत कर्तव्य बजावण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या आरोग्यसेविकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मीना बुट्टे असे या आरोग्य सेविकेचे नाव आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कोरोना योद्धे लसीकरणाचे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी पूर आला म्हणून शांत न बसता आपलं कर्तव्य मीना बुट्टे यांनी बजावलं. सर्व स्तरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे.
गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा आरोग्य केंद्रातील दरेगाव येथील आरोग्य सेविका मीना बुट्टे या सावखेडा येथे लसीकरणासाठी निघाल्या. मीना बुट्टे यांची वाट नांद्राबाद जवळील ओढ्याला आलेल्या पुराने अडविली. ओढ्याला पूर आलेला होता, पाणी वेगाने वाहत होते. ओढ्याच्या पैलतीरावर असंख्य लोक उभे होते. अनेक जण पाण्याचा प्रवाह कमी होण्याचीही वाट बघत होते. मात्र लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी उशीर होईल, या चिंतेत असलेल्या बुट्टे कोणताही विचार न करता सरळ पाण्यात उतरल्या. त्यांचे धाडस पाहून उपस्थितांनाही आश्चर्य वाटले, मात्र त्या थांबल्या नाहीत. अखेर ओढ्याच्या मधोमध गेल्यावर एका मुलाने त्यांना साथ दिली. अन बघता बघता या आरोग्य सेविकेने ओढा पार केला. ओढ्याच्या किनारी असलेल्या उपस्थितांपैकी कुणीतरी याचा व्हिडिओ बनवला आणि तो लगेचच व्हायरल झाला.
हे ही वाचा - Cruise Drug Case : आर्यन खानला दिलासा नाहीच.. तिन्ही आरोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला. त्यांनी तो सीईओ डॉ. निलेश गटणे यांना दाखविला. सीईओंनी श्रीमती मीना बुट्टे यांचे अभिनंदन केले. आरोग्य विभागाच्या असंख्य ग्रुपवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य सेविकेच्या धाडसाचे कौतुक केले आहे. तर लसीकरणाला उशीर होऊ नये म्हणून मी ओढा पार करण्याचा निर्णय घेतला. गेल्या 20 वर्षापासून ग्रामीण भागात काम करत असल्याने आता या गोष्टी अंगवळणी पडल्या आहेत. मात्र हा व्हिडिओ एवढा व्हायरल होईल आणि सीईओ गटणे सर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शेळके सर आपले अभिनंदन करतील, असे कधी वाटले नव्हते. त्यांनी कार्याची दखल घेतली याचेच समाधान वाटते. अस प्रतिक्रिया आरोग्य सेविका मीना बुट्टे यांनी व्यक्त केली.