औरंगाबाद - बजाजनगरातील एस.टी. कॉलनीत बुधवारी (दि. २) सकाळी एका ४५ वर्षीय अनोळखी महिलेचा अर्धनग्न व दोन्ही हात ओढणीने बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. खून करून महिलेचा मृतदेह या ठिकाणी टाकला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
महिलेच्या अंगावर मारहाणीचे व्रण -
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, दत्तात्रय पांढरे हा कामगार बजाजनगरातील एसटी कॉलनीत अनिल वऱ्हाडे यांच्या घरात किरायाने राहतो. सकाळी सहा वाजेच्या सुमारास दत्तात्रय याला घरमालक वऱ्हाडे व अतुल राणे यांच्या घरासमोर अंगावर साडी गुंडाळलेल्या अवस्थेत एक महिला पडून असल्याची दिसून आली. त्याने थोडे पुढे जाऊन पाहिले असता त्याला या ठिकाणी रक्त पडलेले दिसले यामुळे त्याने तात्काळ ही माहिती घरमालक वऱ्हाडे यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार, सहायक पोलीस निरीक्षक मदनसिंग घुनावत व पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यांना अर्धनग्न अवस्थेत पडलेल्या महिलेच्या चेहऱ्यावर तसेच छातीवर मारहाणीचे व्रण दिसले. महिलेच्या नाकातून रक्तस्राव झाल्याने घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त साचलेले दिसले. हा घातपाताचा प्रकार असल्याचे लक्षात येताच त्यांनी याविषयी आपल्या वरिष्ठांना कळविले.
फॉरेन्सिक लॅब, श्वानपथक घटनास्थळी पाचारण -
फॉरेन्सिक लॅब तसेच श्वानपथकाला पाचारण करून पोलिसांनी अनोळखी महिलेस बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले होता. यावेळी डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट -
दरम्यान पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक पोलीस आयुक्त विवेक सराफ, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेविषयी माहिती घेतली.
आरोपी पसार झाले असावे असा अंदाज -
मारहाणीत महिला मयत झाल्याचे पाहून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी मृतदेह घेऊन जात असावा. त्यादरम्यान कुणीतरी येत असल्याची चाहूल लागल्याने महिलेचा मृतदेह तेथेच टाकून आरोपी पसार झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
हेही वाचा - लग्नाचा हट्ट धरणाऱ्या प्रियसीला दिले विषारी इंजेक्शन; प्रियकराला पोलीस कोठडी