गंगापूर (औरंगाबाद) - तालुक्यातील काटेपिंपळगाव येथील रस्ता व शिवना नदी वरील पुलाचे काम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी शिवना नदी पुलावर तब्बल दोन तास जण आक्रोश आंदोलन केले. काही नागरिकांनी पुलावरून शिवना नदीच्या पाण्यात उड्या घेत घोषणाबाजी केली. यावेळी पाण्यात उड्या घेतलेल्या आंदोलनकर्त्यांना शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढत पाण्याबाहेर येण्यास सांगितले. लेखी आश्वासनाची हमी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शिवना नदीच्या पुरात पुल गेला होता वाहुन -
शिवना नदीला आलेल्या पुरात पुल वाहून गेल्याने व रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी नेण्यासाठी अडचणी येत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार पत्रव्यवहार करूनही संबधित विभागाकडून दखल घेतली जात नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. २५ तारखेपर्यंत रस्ता व पुलाचे काम सुरू न केल्यास २६ ऑक्टोबरला जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला होता.
आंदोलनाला तात्पुरती स्थगिती, तीन दिवसात पुन्हा आंदोलन -
प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत. तीन दिवसांत पुलाचे रस्त्याचे काम सुरू न झाल्यास तीन दिवसांत पुन्हा आंदोलन करण्यात येईल. होणाऱ्या परिणामाची जबाबदारी ही सर्वस्व प्रशासनाची राहील, असा इशारा सरपंच मनीषा व्यवहारे यांनी दिला आहे.
हेही वाचा - एसटीप्रवास दरवाढ : उद्या (बुधवारी) एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभर बेमुदत उपोषण
यावेळी माजी खरेदी-विक्री संघाचे सभापती सुभाष धोत्रे, सरपंच मनिषा कृष्णकांत व्यवहारे, उपसरपंच प्रकाश फिंपाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास वैजापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी, माजी बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव, जि.प.सदस्य मधुकर वालतुरे, लासुरटेशन मार्केट कमिटीचे उपसभापती दादासाहेब जगताप, संचालक मनीष पोळ यांनीदेखील या आंदोलनस्थळी भेट दिली. प्रशासनाच्यावतीने नायब तहसीलदार अंकुश साहेब सार्वजनिक बांधकाम विभागाचे रासकर, प्रधानमंत्री ग्रामसडकचे अधिकारी केदार आणि संबंधित अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी आंदोलनात कृष्णकांत व्यवहारे, बाबासाहेब जगताप, नाना धनाड, अण्णा सोनवणे, अनिल धोत्रे, गणेश चव्हाण, नाना थोरात, बबन शेळके, सतीश चव्हाण, कैलास धोत्रे, दत्तू निकम, एन. टी. सोनवणे, आदीसह मोठ्या संख्येने आंदोलनकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी शिवना नदी पुलावर शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर, उपनिरीक्षक शेख, बीट अंमलदार धाडबळे यासह पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.