औरंगाबाद - पती-पत्नीच्या वादात पत्नीने धारदार चाकूने भोसकून पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जवाहरनगर परिसरातील खिवांसरा पार्क येथे घडला. शैलेंद्र शिवसिंग राजपूत (वय 40), असे मृत पतीचे नाव आहे. तर पूजा शैलेंद्र राजपूत असे पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा- औरंगाबादच्या माजी महापौरांच्या हाताच्या बोटाला चोराने घेतला चावा
मृत शैलेंद्र आणि त्यांच्या भावांचा वाळुज एमआयडीसीमध्ये हिरा पॉलीमर नावाचा उद्योग आहे. राजपूत यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना १६ वर्षीय आणि ६ वर्षीय अशा दोन मुली आहेत. राजपूत दाम्पत्यात घरगुती कारणावरून सतत भांडण होत होते. त्यांच्या पत्नीने शैलेंद्रच्या आईविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. सयुंक्त कुटुंबात राहणे पुजाला आवडत नव्हते. यामुळे त्यांच्यात वाद होत होता. पुजाच्या आग्रहाखातर शैलेंद्र हे पैठणरोडवरील बंगला सोडुन चार महिन्यापूर्वी खिवंसरा पार्क येथील मित्राच्या घरात भाड्याने राहण्यासाठी आले होते.
हेही वाचा- खासदार इम्तियाज जलील रझाकारांची औलाद, चंद्रकात खैरेंची टीका
दरम्यान, रात्री पूजा आणि शैलेंद्र या दोघांमध्ये पुन्हा जोरदार भांडण झाले. पत्नीने रागाच्या भरात शैलेंद्रवर चाकूने हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेल्या शैलेंद्रला घाटी रुग्णालयात हलविले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून शैलेंद्रची पत्नी पूजाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा - 'दलित आणि मुस्लिम समाजाने वंचित आघाडीच्या पाठिशी ठाम रहावे'
पप्पा को चाकू मारा, पप्पा उठ नही रहे -
राजपूत दाम्पत्याला दोन मुली आहेत. त्यापैकी लहान मुलीने रक्ताच्या थारोळ्यात घराच्या फरशीवर पडलेल्या शैलेंद्रला उठविण्याचा अतोनात प्रयत्न केला. मात्र, शैलेंद्र काही उठत नसल्याने चिमुकलीने काकाला फोन करुन, "पप्पा को चाकू मारा, पप्पा उठ नही रहे" असे सांगितले. त्यावरुन नातेवाईकांनी जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना सोबत घेऊन शैलेंद्रचे घर गाठले. त्यानंतर घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला.
शैलेंद्र बनावट नोटा प्रकरणात होता अटक -
सन 2003 साली औरंगाबाद शहर पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणात केलेल्या कारवाईत मृत शैलेंद्रचा समावेश होता. या प्रकरणात त्यास अटकही करण्यात आली होती. त्यासह अजून एक गुन्हा त्यावर होता. 1995 ते 2000 च्या काळात एसीबी महाविद्यालय औरंगपुरा, गुलमंडी येथील एका संघटनेच्या टोळी युद्धातही तो अनेकवेळा सक्रिय होता.
पुरावा नष्ट करत असताना पोलीस घरात पोहोचले -
पती शैलेंद्रवर चाकू हल्ला केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. घरात सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला होता. पत्नी पूजाने दोन खोल्यांमधील रक्त पुसून स्वच्छ केले होते. एक खोली स्वच्छ करण्याची बाकी होती. हत्येचा संशय येऊ नये, यासाठी ती जिवाच्या आकांताने कापडाने सर्व रक्त साफ करीत होती. मात्र, त्याच वेळी पोलीस घरात दाखल झाले अन् सर्व बिंग फुटले. पोलीस जेव्हा घरात पोहोचले तेव्हा बाथरुममध्ये रक्ताने माखलेले कपडे बादलीत पडलेले होते.
शैलेंद्रने स्वतः मारून घेतल्याचा पत्नीचा दावा -
पतीच्या हत्येप्रकरणी जेव्हा पत्नी पूजाला जवाहरनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हा आपण आता वाचणार नाही, यासाठी पूजाने मी हत्या केली नाही. शैलेंद्रने स्वतःच चाकू मारुन घेतल्याचा दावा केला आहे. मात्र, घटनेत वापरलेला चाकू अद्याप सापडलेला नाही.