औरंगाबाद - आपेगाव हिरडपुरी बंधार्यात पाणी सोडण्यासाठी शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी पैठण तालुक्यातील शेतकरी आंदोलनाला बसले होते, मात्र शासकीय यंत्रणा अद्यापही कुठलाही ठोस निर्णय घेत नसल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात स्वतःला कोंडून घेत आंदोलनाला सुरुवात केली.
जायकवाडी धरणातून अर्धा टीएमसी पाणी मिळावे, यासाठी २ दिवसांपूर्वी पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासनाच्या आश्वासनानंतर भूमिका बदलत शांतपणे आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांनी दोन दिवस झाले जायकवाडीच्या पायथ्याशी ठिय्या सुरू ठेवले, मात्र प्रशासन निर्णय घेण्यास दिरंगाई करत असल्याने शांतपणे चालू असलेले आंदोलन आता कुठेतरी आक्रमक होत असल्याच दिसून येत आहे.
आपेगाव हिरडपुरी बंधार्यात पाणी सोडल्यास आसपासच्या गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येणार नाही, त्यामुळे जायकवाडी धरणातून किमान अर्धा टीएमसी पाणी सोडावे, या मागणीसाठी पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून आंदोलनाला सुरुवात केली. जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता मात्र प्रशासनाने आपण लवकरात लवकर मागण्या मान्य करून आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले तर जायकवाडीच्या पायथ्याशी गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्याने शांतपणे आंदोलन सुरू केले होते. मात्र शासकीय यंत्रणा अद्यापही आंदोलनाची दखल घेत नसल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी गोदावरी पाटबंधारे च्या पैठण येथील कार्यालयात स्वतःला कोंडून घेतले. जवळपास दोनशे शेतकऱ्यांनी स्वतःला एका दालनांमध्ये बंद केलं. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, असा इशारा या आंदोलक शेतकऱ्यांनी दिला. त्यामुळे गेले दोन दिवस झाले शांत असलेला आंदोलन आता आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे.