औरंगाबाद - भारतातील सर्वात मोठा लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान. उद्या २१ ऑक्टोबरला राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार असून, योग्य प्रतिनिधी निवडून देण्यासाठी सर्व मतदारांनी मतदान करणे गरजेचे आहे. यासाठी जि. प प्रशाला शिवना येथे कार्यरत असलेल्या राज्य आदर्श शिक्षिका सरला कामे-कुमावत यांनी 'जागो मतदार जागो' या उपक्रमांतर्गत बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्याचे एक अनोखे अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा - कन्नड विधानसभा मतदार संघात हर्षवर्धन जाधवांना पाठिंबा द्या - इम्तियाज जलील
सरला कामे या बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून मनोरंजनात्मक अध्यापन तर करतातच शिवाय स्त्री भ्रृण हत्या व मुलींवर होणारे अत्याचार, प्लास्टिक मुक्त भारत, स्वच्छ भारत अभियान, अंधश्रध्दा निर्मुलन यांसारख्या देशव्यापी समस्यांसाठीही बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून व पोस्टर प्रदर्शन व व्याख्यान यांच्या माध्यमातून जनजागृती करतात. त्यांच्या या समाजसेवेची व राष्ट्रीय कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासन व काही संस्थानी त्यांना सन्मानीत केले आहे.
हेही वाचा - प्रचारसभा झाल्यावर ओवेसी यांनी केले नृत्य
मतदान करा, असे आवाहन करण्यासाठी अनेक यंत्रणा काम करतात. मात्र, नाट्य स्वरुपात लहान मुलांना एखादी गोष्ट सांगितली तर त्याच अनुकरण मुलं करत असतात. आपल्या घरात आपल्या गावात, आपल्या परिजनांना मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी बोलक्या बाहुल्यांचा आधार घेत, मतदान किती महत्वाचे आहे, मतदान करताना कोणती काळजी घ्यावी, उमेदवार कसा असावा, आपलं मत आपला विकास कसा करू शकतो. याच महत्व लोकांना पटवून देण्याचे काम सरला कामे या करतात. लहान मूल उद्याच भविष्य आहे. त्यांच्या माध्यमातून जनजागृती करणे सोपं असल्याने विद्यार्थ्यांना सरला कामे या शिक्षिकेने मतदानाच महत्व पटवून दिल. या मोहिमेतून मतदानाचा टक्का वाढेल, असा विश्वास सरला कामे यांनी व्यक्त केला. तर मतदान हा आपला हक्क असून तो आपण सर्वांना पटवून देऊ शकतो, असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. सरला कामे यांच्या कामाचे कौतुक सर्वत्र केले जात आहे.