छत्रपती संभाजीनगर Vande Bharat Express : 'वंदे भारत' एक्सप्रेस सुरु होत असताना जिल्ह्यात पुन्हा एकदा वादाची किनार दिसून आली. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर कार्यकर्ते आपापसात भिडले असताना त्यांचे नेते मात्र एकमेकांसोबत चहा घेण्यात मग्न असल्याचं पाहायला मिळालं. निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यानं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी रोष व्यक्त केला होता. यानंतर समारंभ सुरु होत असताना भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळं सर्वसामान्यांना उत्सुकता असलेल्या सोहळ्यात राजकारण चांगलंच तापलेलं दिसून आलं. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ता आमदार संजय शिरसाट यांनी रेल्वे विभागाचा भोंगळ कारभार असल्याचं सांगितलं. कार्यक्रम सर्वांचा आहे, तर स्थानिक खासदार आमदारांची नाव का वगळली, असा प्रश्न शिरसाट यांनी उपस्थित केलाय.
नावं नसल्यानं नाराजी नाट्य : 30 डिसेंबरपासून जालना - मुंबई 'वंदे भारत' एक्सप्रेस रेल्वेचा शुभारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या इथून हिरवा झेंडा दाखवताच ही गाडी सुरु झाली. मात्र या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर खासदार इम्तियाज जलील यांचं नाव वगळण्यात आलं होतं. त्यावरुन शुक्रवारी दुपारी जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन आक्षेप नोंदवला होता. हा काही भाजपाचा खासगी सोहळा नाही. हा सर्वसामान्यांचा कार्यक्रम आहे. त्यामुळं सर्वसामान्य जनतेमधून निवडून आलेल्या आमदार खासदारांचा यावेळी निमंत्रण पत्रिकेवर उल्लेख असायला हवा होता. असं असलं तरी खासदारांसह स्थानिक मंत्री आणि आमदार यांचे नाव वगळण्यात आलं होतं. यामुळं इम्तियाज जलील आपला रोष व्यक्त केला होता. इतकंच नाही तर कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी घेतली होती. यानंतर रात्री बाराच्या सुमारास नवीन पत्रिका तयार करण्यात आली असून त्यावर सर्वच आमदार खासदारांची नावं टाकण्यात आली. त्यामुळं वाद शमेल असं वाटत होतं, मात्र ऐन कार्यक्रमाच्या वेळी भाजपा आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
कार्यकर्ते भिडले अन् नेते चहा घेताना दिसले : सकाळी अकराच्या सुमारास जालना रेल्वे स्थानकावरुन 'वंदे भारत' रेल्वेचा शुभारंभ झाला. ही गाडी पावणे बाराच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर येणार होती. तिच्या स्वागतासाठी रेल्वे विभागानं तयारी केली असताना, स्थानिक नेत्यांचं आगमनासोबतच कार्यकर्त्यांचं देखील आगमन स्थानकावर झालं. त्यावेळी खासदार इम्तियाज जलील स्थानकावर दाखल होताच, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम' आणि 'मोदी मोदी' अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. हे पाहून एमआयएमचा कार्यकर्त्यांनी देखील भाजपा विरोधी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. एकीकडं प्लॅटफॉर्मवर गोंधळ सुरू असताना, दुसरीकडं रेल्वे स्थानकाच्या व्हीआयपी वेटिंग रुममध्ये सर्व आमदार आणि खासदार गाडीची प्रतीक्षा करण्यासाठी बसले. बाहेर गोंधळ सुरू होता मात्र आतमध्ये नेते एकमेकांसोबत चहापाणी घेत हसून गप्पा मारताना दिसून आले. त्यामुळं कार्यक्रमाला असणारा विरोध नेमका कशासाठी असा प्रश्न यावेळी उपस्थित होतोय.
हेही वाचा :