औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडीतर्फे राज्यभर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहे. या मुलाखतींना चांगला प्रतिसाद मिळत असून मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेब आंबेडकर दावेदार असल्याचे मत, वंचितच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे. याबाबत बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करणार असल्याचे महिला प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी सांगितले आहे.
पक्षातून बाहेर पडलेले लक्ष्मण माने यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना बाळासाहेबांनी त्यांना जवळ केले. त्यांच्यात सुधारणा होईल असे वाटत होते. मात्र, ते पक्षातून बाहेर निघाले. पडळकर आल्यावर आपले पद धोक्यात येईल अशी भीती त्यांना वाटली असावी. सद्या बहुजन वंचित आघाडीकडे असंख्य लोक उमेदवारी मागत आहेत. चारित्र्य संपन्न, उच्च शिक्षित, पक्षातील कार्यकर्ता, सामाजिक जाण असणारे, ६० - ७० वर्षांपासून वंचित असलेल्या घटकांमधून असणाऱ्यांना आम्ही प्राधान्य देणार असल्याचे मत, अण्णाराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.
मराठवाड्यात सध्यातरी नांदेड येथून सर्वाधिक इच्छुक उमेदवार असल्याचे मुलाखतीत समोर आले आहे. काँग्रेससोबत अद्याप आघाडी नाही, त्यांचे पत्र आले. मात्र, बैठकीपूर्वी काँग्रेसने वंचितला भाजपची बी-टीम असल्याचे संबोधले. काँग्रेसने आधी त्याचे उत्तर द्यावे मगच बोलणी पुढे जाईल, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली आहे.
वंचित बहुजन आघाडीमुळे भाजपला मदत झाली असा आरोप केला जातो. मात्र, भाजपला आम्ही नाही, तर ईव्हीएमने मदत केली. म्हणूनच त्यांना इतकी मते मिळाली. निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत ईव्हीएमला आमचा विरोध असणार आहे. या मुलाखती वंचित बहुजन आघाडीच्या आहेत. एमआयएमच्या मुलाखती वेगळ्या होतील. त्यानंतर पक्षश्रेष्ठी चर्चा करतील आणि उमेदवारी जाहीर केली जाईल. औरंगाबादेत खासदार इम्तियाज जलील निवडून आले. त्यांना वंचितांची मते मिळाली. त्यामुळे, औरंगाबादेत वंचित देखील काही जागांवर दावा करणार असल्याची माहिती अण्णाराव पाटील यांनी दिली.