औरंगाबाद - राज्यात लसीकरणाची (Vaccination) टक्केवारी वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्याच प्रयत्नांना साथ म्हणून औरंगाबादच्या जिल्हा परिषदेच्या (Aurangabad ZP) वतीने सलग 75 तास लसीकरण मोहीम राबवण्यात आली. आझादी का अमृत महोत्सव या मोहिमेअंतर्गत (azadi ka amrit mahotsav) ही लसीकरण मोहीम राबवण्यात आली असून चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. वाळूज वडगाव कोल्हाटी येथील लसीकरण केंद्राचा आढावा घेत डॉ. पुष्पलता सावंत आणि नागरिक यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
सलग 75 तास लसीकरण -
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहे. त्याच अनुषंगाने विविध उपक्रम आजादी अमृतमहोत्सव या संकल्पनेतून राबवण्यात येत आहेत. कोरोना महामारीला (covid-19) अडवण्यासाठी लसीकरण हा एकच पर्याय असल्याने या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 75 तास लसीकरण करण्याचा उपक्रम वडगाव कोल्हाटी वाळूज येथे राबविण्यात आला. शुक्रवार दिनांक 12 नोव्हेंबर पासून ते सोमवार 15 नोव्हेंबर पर्यंत हा उपक्रम राबवण्यात आला. दिवस-रात्र न थांबता लसीकरण या मोहिमेअंतर्गत करण्यात आले. मोहीम सुरू करताना साडेसात हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल असे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात चांगला प्रतिसाद मिळाल्याने आठ हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण या मोहिमेअंतर्गत झाल्याची माहिती आरोग्य अधिकारी पुष्पलता सावंत यांनी दिली. आहे.
एकाच केंद्रावर दोन्ही लस उपलब्ध -
कोरानाशी दोन हात करण्यासाठी कोवॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन लस घेण्यास नागरिकांना देण्यात येत आहेत. मात्र दोनही लस एका केंद्रांवर उपलब्ध नाहीत. लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना या दोन्ही लस एकाच ठिकाणी मिळाव्या यासाठी वाळूज येथील या केंद्रावर व्यवस्था करण्यात आली होती. दोन वेगवेगळ्या कक्षांमध्ये यालस नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आलेला प्रत्येक नागरिक घेऊनचं जाईल याबाबतची तयारी आरोग्य विभागाने केली होती. यासाठी बारा वेगवेगळ्या टीम कार्यरत होत्या. यामध्ये केंद्राबाहेर नोंदणी करणे, आत आल्यावर त्याबाबत खात्री करून त्यांना लस देणे, याकरिता डॉक्टर आरोग्यसेविका यांचं मोलाच सहकार्य असल्याचे मत आरोग्य अधिकारी पुष्पलता सावंत यांनी व्यक्त केलं.
कामगारांना देखील झाला लाभ -
जिल्ह्यातील सर्वात मोठा औद्योगिक वसाहत असलेल्या वाळूज भागात कंपनीत जाणाऱ्या कामगारांची मोठी वसाहत आहे. कर्मचारी वेगवेळ्या वेळेत मध्ये कंपनीत कामावर जात असतात. त्यांच्या वेळेत लस उपलब्ध होत नसल्याने अनेक कामगार लसीकरणापासून दूर राहिल्याने या ठिकाणी ही मोहीम राबवली असा निश्चय करण्यात आला होता. शुक्रवार आणि रविवार या दिवशी अनेक कामगारांना साप्ताहिक सुट्टी असते. त्याचा फायदा घेत शुक्रवारी 12 नोव्हेंबर पासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून अनेक कामगारांनी शुक्रवार शनिवार आणि रविवार या तीन दिवसांमध्ये लसीकरण पूर्ण करून घेतले. रात्रीच्या वेळेस देखील लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रात्री आठ ते सकाळी आठ या काळामध्ये दरोज चारशेहून अधिक कामगारांनी लस टोचून घेतल्याची माहिती आरोग्य अधिकारी पुष्पलता सावंत यांनी दिली.
लसीकरणाबाबत केली जनजागृती -
आझादी का अमृत महोत्सव या संकल्पनेतून सलग 75 तास लसीकरण मोहीम राबवत असताना, लसीकरण सोबत जनजागृती करण्याचे काम आरोग्य कर्मचारी यांनी केले. पहिला डोस झाल्यानंतर दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाळूज येथील आरोग्य अधिकारी कर्मचारी यांनी जनजागृती मोहीम राबवली. अनेक ठिकाणी घरी जाऊन लसीकरणाला या असा संदेश त्यांनी दिला. त्यामुळे 75 तासात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लसीकरण करून घेतलं. आमच्याकडे असलेल्या वेळेत केंद्र बंद असल्याने लसीकरण करता आलं नाही. मात्र 75 तासाच्या या मोहिमेत आम्हाला आमच्या वेळेत लस घेणे शक्य झाले असे मत लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी व्यक्त केले.