औरंगाबाद- जिल्ह्यातील काही तालुक्यात अवकाळी पावसाने गेल्या दोन दिवसात जोरदार हजेरी लावली आहे. त्यातच कोरोनामुळे शेतीची खोळांबली होती. त्यामुळे कन्नड तालुक्यातील तेलवाडी परिसरात शेतात सोंगुण उघड्यावर पडलेला गहू भिजल्याच्या घटना समोर येत आहेत. कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या भीतीने शेतीकामाला मजूर मिळत नाही. सोंगणी व काढणी केलेला शेतीमाल वाहतूक करायला गाडी मालक तयार नाही आणि आता अवकाळी पाऊस. त्यामुळे शेतकरी सध्या तिहेरी संकटात सापडला आहे.
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतात नुकताच काढून ठेवलेला गहू, हरबरा भिजून गेला आहे. उभ्या असलेल्या गहू सोंगणीला मजूर किंवा हार्वेस्टर मशीन मिळत नाही. काढणीला आलेले आले, टोमॅटो, हळद, कापूस, मका सह इतर पिकांसाठी मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतीमाल वाहतुकीला परवानगी दिली असतांना, वाहतूक करणारे ट्रॅक्टर व मालगाडी मालक वाहतुकीसाठी सरळ सरळ नकार देत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मजुरांनी एका गावावरून दुसऱ्या गावाला जाणे पोलिसांच्या भीतीने बंद केले आहे.
भाव वाढण्याच्या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस काढून घरात ठेवला आहे. अशा शेतकऱ्यांना आता कापूस खरेदी करणारे व्यापारी मिळत नाही. सध्या आले, हळद व गहू काढण्याचा हंगाम आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीने मजूर मिळत नसल्याने आले व हळद पिकांचा काढणीचा हंगाम संपत चालला आहे. आले शेतात तसेच ठेवता येते मात्र हळद काढणे काढली नाही तर हळदीला कोंब फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गहू काढणी साठी मजूर व मशीन मिळत नसल्याने शेतात उभा असलेल्या गव्हाचे भविष्य अंधकारमय असून गहू गळून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे मोठ्या कष्टाने बाजारपर्यंत आणलेल्या शेतीमालाला बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. शहरात संचारबंदी असल्याने ग्राहकसंख्या मर्यादित असल्याने मालाला उठाव नसल्याने शेतीमालाचा भाव कमी आहे.