औरंगाबाद : 'जनधन खात्यात आतापर्यंत 41 कोटी 70 लाख खाती उघडण्यात आली आहेत. 87 कोटी जनता संज्ञान आहे. सगळ्यांची खाती असायला हवी हा आमचा हेतू आहे', अशी माहिती केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबादेत दिली.
औरंगाबादेत केंद्रीय बैठक
'भारतीय बँक आणि शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या अडचणी लक्षात घेता देशभरातील बँकांचे चेअरमन आणि सीईओंची बैठक मी पहिल्यांदाच औरंगाबादेत बोलावली आहे. ही केंद्र सरकारची बैठक आहे. देशाचे फायनान्स सेक्रेटरी सुद्धा या बैठकीला येतील. नाबार्ड अध्यक्ष, सर्व राष्ट्रीयकृत बँक अध्यक्ष या बैठकीला येतील. 16 तारखेला ही बैठक औरंगाबादमध्ये होईल', अशी माहिती डॉ. भागवत कराड यांनी दिली.
औरंगाबादच्या इतिहासात अशी बैठक पहिल्यांदाच
'बँकांच्या होणाऱ्या बैठकीत औरंगाबादच्या उद्योग वसाहतीचे सादरीकरण सुद्धा या वेळी आम्ही करणार आहोत. दिल्ली, मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचे अध्यक्ष यासाठी येतील. नीती आयोगाचे सदस्य सुद्धा या बैठकीला येतील. औरंगाबादच्या इतिहासात अशी बैठक पहिल्यांदा होणार आहे. यातून औरंगाबादला नक्कीच फायदा होईल', असे डॉ. कराड यांनी सांगितलं. दरम्यान, ओबीसींना डावलून होणारी निवडणूक हा ओबीसीवर अन्याय आहे आणि हे राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालं असल्याचं भागवत कराड यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - कृष्णा, कोयना नदीकाठी अलर्ट; गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी प्रशासनाचा पुढाकार