औरंगाबाद - औरंगाबादेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शनिवारी विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला. गरवारे स्टेडियमवर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर उद्धव ठाकरे यांना बसण्यासाठी शाही खुर्ची ठेवण्यात आली होती. उद्धव ठाकरे व्यासपीठावर आल्यावर त्यांच्या अंगरक्षकांनी त्या खुर्चीवर सॅनिटायझर फवारले. मात्र, उद्धव ठाकरेंनी इतर नेत्यांसाठी असलेल्या खुर्चीवर बसणार असल्याचे सांगितले. ऐनवेळी शाही खुर्ची सोडून साधारण खुर्चीवर उद्धव ठाकरे बसले. त्यामुळे व्यासपीठासह कार्यक्रमस्थळी खुर्चीचा किस्सा चांगलाच रंगल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी 1680 कोटींच्या पाणी योजनेचे भूमिपूजन केले. त्याचबरोबर सफारी पार्क आणि बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे त्यांनी भूमिपूजन केले. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, की बऱ्याच दिवसानंतर जाहीर कार्यक्रमात मी आलो आहे. औरंगाबादपासून सुरुवात करत आहे. अनेक वर्षांपासून पाणी योजनेची केवळ घोषणाच सुरू होती. मात्र आता प्रत्यक्षात काम सुरू झाले. मी नाथांचा श्रीखंड्या, माझ्या कावडीने पाण्याची सोय होत असेल तर हे माझे नशीब आहे. मी फक्त घोषणा करणार नाही. तर कामाची अचानक पाहणी सुद्धा करणार, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. नागपूर शिर्डीपर्यंतचा समृद्धी महामार्ग 1 मे रोजी सुरू करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.
मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला
नऊ महिन्यांपासून मुख्यमंत्री घरात बसून असल्याची टीका करण्यात येत आहे. मी घरी बसलो होतो, मात्र, घरी बसून कामे केली म्हणून भूमिपूजन करण्यासाठी आलो आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला यावेळी लगावला.