औरंगाबाद - कचरा फेकण्यासाठी घराबाहेर गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र एका दुचाकीस्वार चोरट्याने क्षणात लांबवले आहे. सिडको येथील गजानन नगर परिसरात घडलेली चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
गजानननगर येथील रहिवाशी महिला सकाळी पावणेबाराच्या सुमारास घरातील कचरा फेकण्यासाठी बाहेर गेली. परत घराकडे येत असताना त्याच वेळी मागुन एक दुचाकीस्वार चोरटा आला. पुढे काही अंतरावर जाऊन त्याने दुचाकी पुन्हा वळवली व काही सेकंदातच महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेला काही कळण्याच्या आतच चोरटा पसार झाला.
या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देशमुख, विजय पवार, भांडार, राजेंद्र साळुंखे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. त्या आधारे सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सुरु आहे.