औरंगाबाद - खराब रस्ता असल्याने खड्ड्यातून मार्ग काढत औरंगाबादकडे येणाऱ्या दोन तरुणांच्या दुचाकीला टँकरने चिरडले. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास औरंगाबाद- नाशिक महामार्गावर घडली. सुरेश लक्ष्मण उबाळे (वय ३२), अर्जुन तुळशीराम माळी (वय ३० रा. शहापूर बंजर, ता. गंगापूर) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
सुरेशचा चुलत भाऊ हा ठोक टोमॅटो विक्रेता आहे. त्यांच्या आयशर गाडीमध्ये टोमॅटो भरण्यासाठी मृत सुरेश आणि त्याचा मित्र अर्जुन हे दोघेही गावात गेले होते. रात्री 12च्या सुमारास टोमॅटो भरुन झाल्यावर दोघेही एका नातेवाईकाच्या (एम एच 20 सी एम9079) या दुचाकीवरून औरंगाबादला येत होते. यावेळी औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील के.डी. आर.फार्म जवळ औरंगाबादच्या दिशेने सुसाट वेगात येणाऱ्या टँकरने (एम पी-17,एच एच 2533) त्यांच्या दुचाकीला समोरून धडक देत चिरडले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर टँकर चालकाने घटनस्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच दौलताबाद पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत दोन्ही तरुणांना घाटी रुग्णालयात दाखल केले. रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने जप्त केली. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजश्री आढे करत आहेत.
रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे -
औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील माळीवाडा व परिसरातील रस्त्यावर ठिक-ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडलेले आहे.अनेक वर्षांपासून हा रस्ता बनवण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मात्र, ग्रामस्थांच्या मागणीकडे लक्ष दिले जात नाही. या मुळे या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात नित्याचीच बाब झाली आहे. लवकर या रस्त्याची दुरुस्ती केलिगेली नाही तर अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.