औरंगाबाद - जिल्ह्यात काल (9 जून) दमदार पाऊस झाला. काल सायंकाळी फुलमस्ता नदीत दोन युवक दुचाकीसह वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने दोघेही नदीतून बाहेर सुखरूप आले असले तरी त्यांची ओळख पटलेली नाही.
नदीत वाहून गेल्याचे मोबाइलमध्ये कैद
फुलंब्री परिसरातून फुलमस्ता नदी वाहते. ही नदी पुढे फुलंब्री येथील धरणाला जाऊन मिळते. बुधवारी 4 वाजता पावसाने सुमारे एक तास जोरदार हजेरी लावली. त्यामुळे फुलमस्ता नदीला पूर आला होता. फुलमस्ता नदीवर असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने या पुलावरून सायंकाळच्या सुमारास पावसाचे पाणी वाहून जात होते. त्याचवेळी पानेवाडीकडून फुलंब्रीच्या दिशेने एका दुचाकीवर दोघे जण येत होते. पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोघेही दुचाकीसह नदीत वाहून गेले. हा प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दैव बलवत्तर म्हणून दोघेही नदीच्या कडेला जाऊन पाण्याच्या बाहेर सुखरूप निघाले. मात्र, दुचाकी वाहून गेली. हे दोघे वाहून जात असताना नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. दरम्यान, या पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याने आरोग्य कर्मचारी म्हणून घेतली लस, माहिती अधिकारात पुढे आली धक्कादायक बाब