औरंगाबाद - ब्रिजवाडी शिवारातील महानगरपालिकेच्या भूमिगत गटार योजनेच्या पाणी शुध्दीकरणाचे यंत्र अचानक सुरू झाल्यामुळे प्रकल्पात एका पाठोपाठ उतरलेल्या ८ जणांपैकी दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आहे. एक जण अजूनही बेपत्ता आहे. त्याचा अग्निशमन दलाच्या मदतीने शोध घेतला जात आहे. तसेच ५ जणांची प्रकृती अत्यावस्थ असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जनार्दन विठ्ठल साबळे (५५) आणि दिनेश जगन्नाथ दराखे (४0) अशी मृतांची नावे आहेत, तर रामेश्वर केरुबा डांबे (२७) याचा शोध सुरू आहे.महानगर पालिकेने पाणी शुध्दीकरणासाठी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सिडको, हडकोतील पाणी ब्रिजवाडीतील प्रकल्पात आल्यावर शुध्दीकरणानंतर ते शेंद्रा औद्योगिक वसाहतीकडे पाठविले जाते. याठिकाणी असलेल्या चेंबरमध्ये पाणी चोरण्यासाठी शेतकऱ्यांनी मोटारी लावलेल्या आहेत. या मोटारींव्दारे शेतातील भाजीपाल्याला पाण्याचा पुरवठा केला जातो. सोमवारी दुपारी अचानक पाणी बंद झाले. त्यामुळे जनार्दन साबळे, दिनेश दराखे आणि रामेश्वर डांबे तिघे सुरूवातीला गटारात उतरले. त्यापैकी डांबेला व्हॅक्युमने आत ओढून घेतले, तर साबळे व दराखे श्वास गुदमरल्याने चेंबरमध्ये पडले. बराचवेळ झाला तरी तिघेही का बाहेर येत नाही? म्हणून एका पाठोपाठ रामकिसन रंगनाथ माने (४७), उमेश जगन्नाथ कावडे (३२) व प्रकाश केरुबा वाघमारे (५५) हे शेतकरी उतरले. पण याचवेळी प्रकल्पाचे यंत्र अचानक सुरू झाल्यामुळे पाण्याच्या प्रवाहासोबत उतरलेले सर्व शेतकरी देखील आत ओढल्या गेले. हा प्रकार पाहून शिवशंकर माने व नवनाथ रंगनाथ कावडे (४०) यांनी दोघांना वाचविले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिघांना त्यामधून बाहेर काढले. यावेळी नवनाथ यांचा श्वास गुदमरल्याने अत्यावस्थ झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह मनपाचे काही अधिकारी, नगरसेवक, पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या उमेश, प्रकाश व रामकिसन यांची प्रकृती चिंताजनक आहे.