औरंगाबाद - कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आजपासून जिल्ह्यात दोन दिवसांचा बंद पाळला जात असल्याने सकाळपासूनच सर्वत्र कडकडीत बंद पळाला गेला. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद ठेवल्याने रस्त्यावरील वर्दळ पूर्णतः बंद झाल्याचे पाहायला मिळाले.
दोन दिवस राहणार बंद -
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या चार दिवसांमध्ये जवळपास 3 हजार नवे रुग्ण आढळून आले आहे. तर जवळपास 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याची भीती वर्तवली जात असल्याने आरोग्य सुविधांवर येणारा ताण पाहता जिल्हा प्रशासनाने 11 मार्च ते 4 एप्रिल याकाळात अंशतः लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात प्रत्येक शनिवार आणि रविवार बाजार पेठांमध्ये होणारी गर्दी पाहता या दोन दिवशी पूर्णतः बंद पाळण्याची घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली. त्यानुसार आजच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. सकाळपासूनच रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला. असाच बंद पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
4 एप्रिलपर्यंत अंशतः लॉकडाऊन -
कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्यासह आरोग्य अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत 4 एप्रिलपर्यंत अंशतः लॉकडाऊन पाळण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार रात्री 9 ते सकाळी 6 या काळात कडकडीत बंद पाळण्याची घोषणा करण्यात आली. इतकंच नाही, तर जिल्ह्यातील विवाह सोहळे रद्द करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढल्यास दहा ते पंधरा दिवस लॉकडाऊन लावण्याचे संकेत देण्यात आले असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
हेही वाचा - परभणी : संचारबंदीत किरकोळ वाहतूक सुरूच; प्रतिष्ठाने मात्र कडकडीत बंद