औरंगाबाद : गंगापूर तालुक्यात शुक्रवारी दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गंगापूर लासुर मार्गावर गंगापूर शहरातील बजाज फायनान्स ऑफिससमोर दोन दुचाकीच्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना पाच वाजेदरम्यान घडली आहे. पंढरीनाथ टेमकर राहणार भालगाव असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. गंगापूर लासुर मार्गावर दोन दुचाकीचा अपघात झाला होता. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ याने अपघातातील गंभीर जखमी दुचाकीस्वाराला गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
विजेचा धक्का लागून मृत्यू : गंगापूर तालुक्यातील अगरकानड गाव येथे राहत्या घरात विजेचा धक्का लागून मजुरी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील अगरकानडगाव येथे शुक्रवार रोजी सायंकाळी घडली आहे. प्रकाश बर्डे असे विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या मजुरी करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घरात विजेचा शॉक लागल्याने घरच्यानी त्याला गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. प्रकाश बर्डे असे विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रकाश याचे गतवर्षी लग्न झाले होते. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यावर रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला होता. तरुणाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मागील घटना : 9 जानेवारीला कन्नड तालुक्यातील मकरंदपूर येथील विष्णू हे पत्नी व आठ महिन्यांच्या चिमुकल्यासह दुचाकीने दौलताबादकडून पडेगावच्या दिशेने येत होते. दुचाकीचालकाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव कारने धडक दिली होती. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील पती, पत्नी आणि लहान मुलगा दूरवर फेकले गेले होते. डोके व छातीला गंभीर दुखापत झाल्याने पतीचा रुग्णालयात नेईपर्यंत मृत्यू झाला होता. पत्नी व चिमुकल्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. विष्णू त्र्यंबक वाघ असे मृताचे नाव आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे कुटुंब गावाकडून शहरात येण्यासाठी रवाना झाले होते. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार, कारचा वेग इतका होता की, विष्णू यांच्या दुचाकीचे हँडल कारच्या चाकाखाली येऊन चुराडा झाला होता, तर चाकदेखील वेगळे झाले होते. चिमुकल्यावर वॉर्ड क्रमांक २४ मध्ये उपचार सुरू होते. ऐतिहासिक वेरूळकडे जाणाऱ्या मार्गावर सुसाट वाहनांना ओव्हरटेक करण्याचे प्रकार पडेगाव - दौलताबाद दरम्यान अधिक झाले आहे.