औरंगाबाद - जिल्ह्यात मंगळवारी 22 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 327 वर पोहोचली आहे. तर, मध्यरात्री उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 57 झाली आहे. जिल्हा प्रशासनाने याबद्दलची माहिती दिली.
औरंगाबादमध्ये मंगळवारी आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये जुना मोंढा (1), बायजीपुरा (1), रोहिदासपुरा (1), कांचनवाडी (1), भारतमाता नगर हडको(1), नवीनवस्ती जुनाबाजार (4), जुना हनुमान नगर (1), हनुमान चौक (1), न्याय नगर (1), कैलाश नगर (1), रामनगर (1), एन 8 सिडको (4), रोशन गेट (1), एन11 सुभाषचंद्र नगर (1), पुंडलीक नगर (1), भवानी नगर (1) या भागातील रुग्णांचा समावेश आहेत.
या रुग्णांमध्ये 11 महिला आणि 11 पुरुषांचा समावेश आहे. मंगळवारी मध्यरात्री दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यात जयभीमनगर येथील 72 वर्षीय रुग्णाला जिल्हा रुग्णालयातून उपचारासाठी घाटी रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या रुग्णाला उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा त्रास होता. तर जाधववाडी येथील 57 वर्षीय रुग्णाचाही मंगळवारी मृत्यू झाला. या रुग्णाला मेंदूचा क्षयरोग होता. उपचार सुरू असताना रात्री 12.30 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.