औरंगाबाद - कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानी सैन्याला धूळ चारणाऱ्या भारतीय सैन्यातील हुतात्म्यांना आज मानवंदना देण्यात आली. माजी सैनिकांच्यावतीने हा कार्यक्रम झाला असून नगरनाका येथील वीरचौकातील स्मारकाला वंदन करण्यात आले.
कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून युद्धाच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यासोबतच लष्करी जवानांच्या शौर्यालाही औरंगाबादकरांनी सलाम केला.
भारत-पाकिस्तानमध्ये १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन विजय’च्या माध्यमातून पाकला धूळ चारली होती. या मोहिमेमध्ये भारतीय लष्करातील जवानांनी दाखवलेल्या शौर्याची आठवण ठेवण्यासाठी दरवर्षी २६ जुलै रोजी हा दिवस 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो.
त्यामुळे लष्करातील निवृत्त सैनिकांनी आज छावणी परिसरातील वीर चौकात असलेल्या अमर जवान स्मारकाला भेट देऊन हुतात्मा जवानांना मानवंदना दिली. यावेळी निवृत्त सैनिक तसेच महिलांची उपस्थिती होती.