औरंगाबाद - कोरोना महामारीमुळे अनेक व्यवसायांना आर्थिक फटका बसला आहे. राष्ट्रध्वजाच्या विक्रीवर देखील याचा परिणाम झाल्याचे समोर आले आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी ध्वजाच्या विक्रीमध्ये तब्बल 90 ते 95 टक्क्यांनी घट झाली आहे.
औरंगाबादच्या खादी ग्राम उद्योग भवनात मागील वर्षी १ हजार ५०० ध्वज विक्रीसाठी आणण्यात आले होते. त्यापैकी १ हजार ४०० ध्वजांची विक्री झाली होती. यावर्षी कोरोनाच्या अनुषंगाने अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे खादी भवनात फक्त ७०० ध्वज मागवण्यात आले होते. त्यापैकी अवघ्या 40 ते 45 ध्वजांची विक्री झाल्याची माहिती खादी ग्रामोद्योगचे व्यवस्थापक रामजी सावंत यांनी दिली.
औरंगाबादच्या खादी ग्राम उद्योग भवनात राष्ट्रीय ध्वजाची विक्री केली जाते. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे आणि 17 सप्टेंबर(मराठवाडा मुक्ती दिन) या दिवसांसाठी प्रामुख्याने ध्वजाची विक्री होत असते. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट आहे. अशा संकटात अनेक ठिकाणी ध्वजारोहण रद्द होण्याची शक्यता लक्षात घेऊन खादी ग्रामोद्योगतर्फे कमी प्रमाणात ध्वज मागवण्यात आले होते. त्याप्रमाणे नांदेडहून औरंगाबादला सातशे ध्वज मागवण्यात आले होते. दरवर्षी हे राष्ट्रीय ध्वज रेल्वेच्या कुरियर सर्व्हीसद्वारे मागवले जातात. मात्र, यावर्षी रेल्वेची सेवा बंद असल्याने खादी ग्रामोद्योगाच्या व्यवस्थापकांनी आपल्या खासगी वाहनातून नांदेडहून राष्ट्रीय ध्वज आणले. गेल्या काही दिवसांमध्ये ध्वजाच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात फरक पडल्याचे दिसून आले. सातशे ध्वजांपैकी अवघे 40 ते 45 ध्वजांची विक्री झाली आहे.
खादी ग्राम उद्योग हा कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून कपड्यांची विक्री जवळपास शून्यावर आली आहे. मात्र, काही उत्पादनांची विक्री आजही कायम असल्याची माहिती खादी ग्राम उद्योगचे व्यवस्थापक रामजी सावंत यांनी दिली. मार्च महिन्या अगोदर खादी ग्राम उद्योग भवनात कपडे आणि इतर साहित्याची रोज 40 ते 50 हजरांची विक्री होत होती. आता अनलॉकनंतर ही विक्री 15 हजार रुपयांवर आली आहे. ग्राहकांनी कापड खरेदी जवळपास बंद केली असून आयुर्वेदिक उत्पादनावावर भर देत असल्याचे चित्र आहे.