औरंगाबाद - शहरात वाढत्या कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता पुन्हा टाळेबंदी लागण्याची शक्यता दिसत आहे. तद्पूर्वी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 11 मार्च ते 4 एप्रिल याकाळात अंशतः टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, घाटी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, पालिका आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांच्या झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.
चार एप्रिलपर्यंत पर्यटन स्थळ राहणार बंद
औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी टाळेबंदी करण्यात आली होती. त्यापूर्वी जिल्ह्यातील पर्यटन स्थळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चार महिन्यांपूर्वी पर्यटन स्थळे पुन्हा सुरू करण्यात आली होती. मात्र, कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने चार एप्रिलपर्यंत पुन्हा पर्यटन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना मान्यता असणार नाही, त्यामुळे कोणीही मोर्चे, आंदोलन करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.
शनिवार-रविवार असणार पूर्ण बंद
11 मार्चपासून ते 4 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात अंशतः टाळेबंदी लावण्यात आली आहे. या काळात रात्री नऊ ते सकाळी सहा बंद असणार आहे. हॉटेल चालकांनी तरी नऊ वाजता हॉटेल बंद करायचे आहेत. मात्र, होम डिलिव्हरी रात्री अकरापर्यंत करता येणार आहे. पण, या काळात दर शनिवारी व रविवारी पूर्ण बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे 13, 14, 20, 21, 27 व 28 मार्च तसेच 3 व 4 एप्रिल रोजी जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू असणार आहेत.
चार एप्रिलपर्यंत लग्न समारंभास बंदी
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लग्न समारंभ करण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. लग्न सोहळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यात कोविडच्या नियमांचे पालन कोणीही करताना दिसून येत नाही. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
भाजी मंडई राहणार सात दिवस बंद
शहरातील भाजी मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने 11 ते 17 मार्च या काळात जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात बाजारातील व्यावसायिकांनी कमी गर्दी करून नियमांचे पालन करून बाजार कसा चालवता येईल हे स्पष्ट करावे त्यानंतर पुढील निर्णय घेता येईल, असे संकेत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिले.
शहरात अपुरी पडणार बेड व्यवस्था
औरंगाबाद शहरात पालिकेने 2 हजार 250 खाटा कोरोनाग्रस्तांसाठी आरक्षित केल्या आहेत. त्यापैकी अवघे नऊशे खाटा रिक्त राहिले आहेत. त्यात रोज किमान 450 नवे कोरोनाग्रस्त आढळून येत आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण वाढत चालला आहे. रविवारी रात्रीपर्यंत 3 हजार 218 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण रुग्णसंख्या 52 हजार 969 इतकी झाली असून 48 हजार 459 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. तर 1 हजार 292 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत असल्याने शहरात टाळेबंदी लावण्याचा विचार करण्यात येत आहे. मात्र, त्याआधी अंशतः टाळेबंदी लावून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न जिल्हाप्रशासन करत आहे.
खासदार जलील यांनी केली टीका
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णयावर खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. कोरोना सोबत यांची बैठक झाली आहे का? की त्यांनी सांगितले की मी फक्त शनिवार आणि रविवार नागरिकांना त्रास देणार आहे आणि इतर दिवशी नाही. निर्णय घेतला लोकप्रतिनिधींना का विचारात घेतले नाही. आम्हाला इतकी अक्कल नसेल मात्र घेतलेले निर्णय कसे बरोबर आहेत हे तरी समजून सांगायला हवे, अशी टीका त्यांनी केली. लागणारे लग्न रद्द करायला कस सांगू शकता. नोंदणी पद्धतीने लग्न कराण्यापूर्वी एक महिन्यापूर्वी नोंदणी करावी लागते. हे जिल्हाधिकाऱ्यांना माहीत नाही का? लग्न म्हणजे मुला-मुलींच्या आई वडिलांचे स्वप्न असते, याची जाणीव ठेवायला हवी होती. तुम्ही काही निर्बंध घालायला हवे होते. मंगल कार्यालयासमोर पोलीस लावणे, एखादे पथक नेमूण पाहणी करून नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करणे, असे उपाय शक्य झाले असते. मात्र, तसे का केले नाही, असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - जिल्हा परिषद सदस्याच्या वाढदिवसाला कोरोनाचा पडला विसर
हेही वाचा - महिला दिन विशेष - जयश्री जोशी यांची भरारी, मसाले उद्योगात कोटींचे उड्डाण