कन्नड (औरंगाबाद) - भरधाव आयशर (टेम्पो) आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार (आज) दुपारी सोलापूर-धुळे महामार्गावरील कन्नड अंधानेर बायपास वळणावर घडली.
चाळीसगावहुन औरंगाबादकडे भरधाव वेगाने जाणारा आयशर टेम्पो (क्र.एम एच 20 इ एल 3644) ने कन्नड येथून चाळीसगावच्या दिशेने जाणाऱ्या मोटार सायकल (एम एच 20 बी एस 3993) ला समोरून जोराची धडक दिली. त्या मोटारसायकल वरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मोटारसायकलवरील मृत्यू पावलेले मुकेश केकडीया (वय 22), सुनील पुण्या वास्के (वय 15), भवानीसिंग छमकर लिंगवा (वय 22) यांचा समावेश आहे. हे तिघे मध्यप्रदेश येथील रहिवासी आहेत. तिघेही मजुरीनिमित्त इकडे आलेले होते.
उड्डाणपूल करण्याची मागणी -
सदर अपघात महामार्गावरील अवघड वळणावर घडला. याबाबत रेल्वे संघर्ष समिती तसेच परिसरातील गावातील नागरिक पदाधिकारी यांनी हा वळण धोकादायक असून राष्ट्रीय प्राधिकरण यांनी येथे उड्डाणपूल तयार करावा अशी मागणी केलेली होती. संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा माजी जि.प. अध्यक्ष डॉ. अण्णा शिंदे यांनी माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी देखील राष्ट्रीय प्राधिकरण अधिकाऱ्यांना हे अपघात स्थळ होऊ शकतात. त्यामुळे येथे योग्य त्या उपाययोजना कराव्यात, चुकीचे फलक दुरुस्त करावेत याबाबत सुचविले होते. तसेच जेथे अपघात घडला तो कन्नड अंधानेर बायपास वळण रस्ता आणि औरंगाबादहुन कन्नडमध्ये प्रवेश करतानाचा बायपास वळण रस्ता हा चुकीचा असून येथे उड्डाणपुलाची गरज होती. मात्र नको तेथे उड्डाण पूल घेतल्याने सदर अपघात होत असल्याची चर्चा नागरिक, प्रवाशी वाहन चालकांत होती. राष्ट्रीय प्राधिकरण अधिकारी यास जबाबदार असल्याचेही मत नागरिकांनी बोलून दाखविले.